पिंपरी : ‘पाकिस्तानबरोबर चांगले संबंध व्हावेत, अशी इच्छा होती. मात्र, त्यांच्याकडून काश्मीरमध्ये पंडित, उत्तर प्रदेशातील मजुरांवर हल्ला झाला. आता पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. त्यामुळे युद्ध झाले, तरी बेहत्तर पण पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे,’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

रामदास आठवले रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आठवले म्हणाले, ‘पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी हिंमत असेल, तर लष्कराबरोबर लढावे. पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी भारतात येतात. पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. तो भाग आपल्या ताब्यात यावा. या हल्ल्याने देशातील सर्वधर्मीय एक झाले आहेत. देशातील मुस्लिम समाजानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

‘स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत होतील,’ असे भाकीत वर्तवून आठवले म्हणाले, ‘महायुती मजबूत आहे. पिंपरीत महायुतीने निवडणूक एकत्रित लढवावी. रिपाइंला आठ जागा मिळाव्यात. निश्चितच महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकेल. राज्यात रिपाइंला एक विधानपरिषद आणि एक मंत्रिपद द्यावे, विविध मंडळावर पदे द्यावीत. याबाबत आपण महायुतीतील वरिष्ठांकडे यादी दिली आहे.’