एका ईस्ट इंडिया कंपनीने दीडशे वर्षे राज्य करताना भारताला पुरते लुटले. त्याचे घाव अद्यापही भरलेले नाहीत, असे असताना आता परदेशी कंपन्यांना निमंत्रित करून कसले ‘मेक इन इंडिया’ करणार, असा खडा सवाल करीत योगगुरू रामदेव बाबा यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. स्वदेशी उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्याचे काम हे खरे ‘मेक इन इंडिया’ असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’तर्फे (जितो) आयोजित ‘जैन कनेक्ट २०१६’ या जागतिक परिषदेत ‘मेक इन इंडिया’ या विषयावर रामदेव बाबा यांचे व्याख्यान झाले. जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, राजेश सांकला, नरेंद्र छाजेड, अजित सेटिया, उद्योजक रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल, विधिज्ञ अॅड. एस. के जैन, जितो अॅपेक्सचे अध्यक्ष तेजराज गुलेचा, राकेश मेहता, धीरज कोठारी, अचल जैन, ओमप्रकाश रांका, चकोर गांधी, शांतिलाल मुथा, अनिरुद्ध देशपांडे, प्रदीप राठोड या वेळी उपस्थित होते.
भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जगामध्ये सर्वत्र आर्थिक मंदीचे वातावरण आहे. अशा वेळी परदेशी कंपन्या भारतामध्ये पाय रोवू पाहत आहेत. देशातील उद्योगांना वाऱ्यावर सोडायचे आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून परदेशी उद्योगांना पायघडय़ा घालायच्या हे धोरण देशाला प्रगतिपथावर नेईल का, असा प्रश्न रामदेव बाबा यांनी उपस्थित केला. स्वदेशी कंपन्यांना सक्षम करणे आणि स्वदेशी उत्पादनांपुढे परदेशी कंपन्यांची रांग लागणे हे खरे मेक इन इंडिया आहे. हाच विचार आम्ही ‘पतंजली’च्या माध्यमातून केला आहे. पतंजलीमध्ये मी संचालक किंवा व्यवस्थापकीय संचालक नाही. केवळ पैसा कमावणे हाच हेतू न ठेवता मिळालेला नफा शंभर टक्के देशसेवेसाठी वापरायचा हा वसा घेऊन केलेल्या उद्योगातून हे शक्य होते. प्रामाणिकपणे व्यवसाय केला, तर लोक पाठिंबा देतात त्याचे पतंजली हे उदाहरण आहे.
व्यापार आणि उद्योगामध्ये जैन समाजाचा माठा वाटा असल्याचे सांगून रामदेव बाबा म्हणाले, व्यापारातून पैसा कमवायचा. परंतु, दुसऱ्याची घरे बरबाद करून मिळणारे धन नको, ही शिकवण आचरणात आणली पाहिजे. दारू आणि गुटखा शरीराचे आणि कुटुंबाचेही नुकसान करतो. त्यामुळे जैन समाजाने मी गुटखा खाणार नाही, अशी शपथ घ्यावी. केवळ संपत्ती वाढविण्याचा विचार न करता आपले आरोग्यही टिकविले पाहिजे. जैन समाजाने भविष्यामध्ये भव्य मंदिरे न उभारता शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उभारावीत. आपल्या देशातील मुलांनी परकीय दूतावासासमोर रांगा लावून उभे राहण्यापेक्षा परदेशी विद्यार्थ्यांनी योग, आयुर्वेद, कला, शास्त्र आणि संस्कार शिकण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थांसमोर रांगा लावाव्यात, असा भारत घडवायचा आहे. त्यामध्ये जैन समाजाने योगदान द्यावे.
शांतिलाल मुथा, विजय भंडारी, तेजराज गुलेचा, राकेश मेहता आणि राजेश सांकला यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावरच योगाची प्रात्यक्षिके
आपल्या अमोघ वक्तृत्वाने रामदेव बाबा यांनी श्रोत्यांना तासभर खिळवून ठेवले. पैसे कमावताना तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करता आणि मग पोट सुटते, असे सांगून रामदेव बाबा यांनी चक्क व्यासपीठावरच अनुलोम-विलोम आणि कपालभाती कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सूर्यनमस्कार हा सर्वात चांगला व्यायाम असल्याचे सांगत त्यांनी पाच सूर्यनमस्कार घातले. महिलांनी देखील हा व्यायाम करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader