इंदापूर : आपले इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी, तसेच आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इंदापूर शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करावे .आणि माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले. वसुंधरा अभियानांतर्गत इंदापुरातील भागर्वराम तलावाच्या पाठीमागे देवराई जंगलासाठी शहा नर्सरी व देवराई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वृक्ष पुरवठा करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी रमेश ढगे, इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा व वृक्षसंवर्धक अंकिता शहा, शहा नर्सरीचे विश्वस्त मुकुंद शहा, नगरपरिषदेच्या अधिकारी रश्मी बारसकर, अविनाश बर्गे, रविराज राऊत, प्रसाद देशमुख, अशोक चिंचकर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना रमेश ढगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अंतर्गत, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने, इंदापूर देवराई करण्यासाठी, जवळपास दीड एकर क्षेत्रावर सहाशे पन्नास पेक्षा अधिक वृक्ष लावले असून, येणाऱ्या काळात इंदापूर नक्कीच हिरवेगार होईल. अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा म्हणाल्या की, इंदापूर नगर परिषदेच्या वतीने अटल घनवन एक आणि अटल घनवन दोन, तसेच इंदापूर बायोडायव्हर्सिटी यामध्ये, हजारो वृक्षांचे संगोपन करून इंदापूर शहराला नैसर्गिक ऑक्सिजन देण्याचे काम, इंदापूर नगरपरिषदेमार्फत करण्यात आले. असून, आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात देवराई मध्ये झाडे लावलेली आहेत. येणाऱ्या काळात नक्कीच इंदापूर शहर स्वच्छ सुंदर आणि विपुल नैसर्गिक ऑक्सिजन युक्त होईल. याची मला खात्री आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
दरम्यान ,देवराईत शंभर पेक्षा अधिक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये काटेसावर, चिंच, हदगा, मेहंदी, धावडा, उंबर, कुंभा, मोहगणी, ताम्हण, करंज, वावळ, हुंडी, सोनचाफा,सीता, अशोक, तिवस, जास्वंद, भेंडी, नाना,रोहितक, वड,काळी निरगुडी,पांढरी निरगुडी, लोखंडी,आग्नेयन हिरडा, फायकस, टॅटू, टेम्भूर्णी,बाभूळ,पिंपळी, कृष्णकमळ, सितारंजन, मायनी रट्टा रानजाई, रतनगुंज, कांचन, गुळवेल, हळद कुंकू, रातराणी, कडुलिंब, चित्रक, जाई, जुई, बेल कोरंटी, बहावा, पिंपळ, आंबा, रिटा, माधवी लता, गोकर्णी, आडुळसा, महारुख, कवट, भोकर, करमळ, बेहडा, अर्जुन, जांभुळवेल बकुळ, खीरणी, पिवळा कांचन, पांढरा चाफा, पेरू, नेवर शेवगा, खैर, कढीपत्ता, मारमीया, पांढरा कांचन रक्तचंदन, रुई, काजू, कढीपत्ता, तुती, मायाळू, बेहडा, शंकासुर, वारंग, घंटी फुल, सिंधी, विड्याचे पान, बूच पांगरा, शेर, शिवण, लोखंडी, इलायची, चिंच, पुत्रंजीवा कदंबा, करवंद, मोगरा, सिसम, जांभूळ, कुसुम, रामफळ आदी प्रकारची फळझाडे, देशी झाडे, औषधी झाडे फुलझाडे, फळ झाडांची व वेलिंची साडे सहाशे देवराईमध्ये लावण्यात आली.