पुणे : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी झालेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी बाँम्बस्फोटानंतर बंगळुरूहून बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. बल्लारी स्थानकातून बस बदलून संबंधित दहशतवादी कर्नाटकातील हाेस्पेट, गोकर्णपर्यंत गेल्याचा संशय आहे. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली आहे. मात्र, संशयित दहशतवादी नक्की पुण्यात पोहोचला किंवा वाटेत त्याने बस बदलली, याबाबत सांगता येत नाही, अशी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – ‘सीटीईटी’ची तारीख जाहीर, अर्ज प्रक्रियाही सुरू
कर्नाटकातील तपास यंत्रणांनी याबाबतची माहिती ‘एनआयए’च्या पुणे-मुंबईतील पथकांना दिली आहे. मात्र, संशयित दहशतवाद्याचा वावर नेमका कोठे आहे, हे निश्चित सांगता येत नाही. संशयित दहशतवादी नेमका कसा पसारा झाला. यादृष्टीने तपास सुरू आहे. बंगळुरुतील बल्लारी, हाेस्पेट, भटकल, गोकर्ण या बसस्थानकांतील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवण्यात येत आहे. भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय असल्याचे ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा – पिंपरी : विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करणारी टोळी अटकेत
दरम्यान, बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत १ मार्च रोजी बाॅम्बस्फोट घडविण्यात आला. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून संशयित दहशतवादी तेथून पसार झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात संशयित दहशतवादी आढळून आला. चित्रीकरणाद्वारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.