नाटय़गृहाला वर्षांकाठी जेमतेम ४१ लाखांचे उत्पन्न; तीन महिने नाटय़गृह बंद; दुरुस्ती कागदावरच

पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाने तोटय़ातच राहण्याची परंपरा मावळत्या आर्थिक वर्षांतही कायम ठेवली आहे. वर्षांकाठी जेमतेम ४१ लाख उत्पन्न मिळवून देणाऱ्या या नाटय़गृहाच्या खर्चासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे आहेत. दुरुस्तीसाठी तीन महिने नाटय़गृह बंदच ठेवण्यात आले. त्यामुळे रसिकांची गैरसोय झाली, अपेक्षित सुधारणा झाल्याचे मात्र दुरुस्तीनंतरही दिसून आले नाही.

पिंपरी महापालिकेने १९९५ मध्ये या नाटय़गृहाची उभारणी केली. शहरात तीन नाटय़गृहे असली, तरी चिंचवड सर्वार्थाने सोयीचे नाटय़गृह आहे. कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, नाटय़रसिकांना चांगली नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत, हा उद्देश नाटय़गृह सुरू करण्यामागे होता. प्रत्यक्षात मात्र उद्दिष्टपूर्ती झाल्याचे कधी दिसलेच नाही. नाटय़गृहातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. देखभाल, दुरुस्ती, सुधारणा, वीज बिल, वातानुकूलित यंत्रणा आदींच्या माध्यमातून करण्यात येणारा खर्च मात्र खूपच मोठा आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची उत्पन्न व खर्चातील प्रचंड विसंगती राखण्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात चिंचवड नाटय़गृहातून अवघे ४१ लाख १६ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने नाटय़गृह दुरुस्तीसाठी बंदच ठेवण्यात आले होते.

या काळात कोणतेही कार्यक्रम होऊ शकले नाहीत. मोठय़ा प्रमाणात दुरुस्तीचा खर्च झाला. प्रत्यक्षात नाटय़गृह सुरू झाल्यानंतर किरकोळ अपवाद वगळता कोणतेही काम झाले नसल्याचे निदर्शनास आले होते. नाटय़गृहात होणाऱ्या नाटकांची संख्या खूपच कमी आहे. वर्षभरात ९१ नाटय़प्रयोग झाले. त्यामध्ये व्यावसायिक नाटके, स्वस्त नाटक योजनेचे प्रयोग, एकांकिका स्पर्धा आदींचा समावेश होता. १० ऑर्केस्ट्रॉ, शाळांची स्नेहसंमेलने, समाजांचे मेळावे यांसारखे विविध कार्यक्रमही पार पडले.

चिंचवड नाटय़गृहात चांगली नाटके लागत नाहीत, अशी रसिक प्रेक्षकांची तक्रार आहे. तर, चिंचवडच्या तारखा उपलब्ध होत नाहीत, असे आयोजकांचे म्हणणे आहे. शनिवार, रविवारी नाटकेच व्हावीत, या दृष्टीने अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला काही प्रमाणातच यश आले. तारखा घेऊन त्या रद्द करण्याचे किंवा इतरांना हस्तांतरित करण्याचे प्रकारही सर्रास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader