‘फॅन्ड्री’ चित्रपटाचा शेवट करताना भिरकावलेला ‘तो’ दगड जात-पात मानणाऱ्यांसाठी होता, विषमता व अनिष्ट प्रथा पाळणारे, एखाद्याला हीन समाजणारे या सर्वासाठी तो होता. समानतेचा विचार मान्य व्हावा, हा हेतू त्यामागे होता. तो विचार बऱ्यापैकी समाजमनापर्यंत पोहोचल्यासारखे वाटते, असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देहूत केले.
रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनच्या वतीने मंजुळे यांना रामकृष्ण मोरे कलागौरव पुरस्कार आमदार बाळा भेगडे व लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमदार सुरेश गोरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुहास गोलांडे व मोठय़ा संख्येने देहूकर उपस्थित होते. त्यानंतर, मंजुळे यांची निवेदक नाना शिवले, पत्रकार सुनील लांडगे, विश्वास मोरे यांनी प्रकट मुलाखत घेतली, तेव्हा ते बोलत होते. ‘फॅन्ड्री’तील सूरज पवार व राजेश्वरी खरात हे कलावंतही सहभागी झाले होते.
मंजुळे म्हणाले, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेच्या अंधारकोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षांनुवर्षे बाहेर पडण्यासाठी धडपडते आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतानाही सामाजिक रूढी-परंपरेत, जातीव्यवस्थेत अजूनही अडकून पडले आहे. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणून काही भावना असतात, त्याचे इतरांना काही घेणे-देणे नसते, याचे चित्रण फॅन्ड्रीतून केले.
नव्या ‘सैराट’ची प्रेमकथाही आवडेल
‘फॅन्ड्री’तील प्रेमकथा व सामाजिक संदेश असलेली कथा रसिकांना खूपच आवडली. आपला आगामी ‘सैराट’ चित्रपटाची वेगळ्या पध्दतीची प्रेमकथा व त्यातील गाणीही आवडतील, असा विश्वास नागराज मंजुळे यांनी व्यक्त केला. ‘फॅन्ड्री’चा दुसरा भाग येणार नाही, कारण तो ‘सिंघम’ प्रकारातील चित्रपट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.