पुणे : ‘संतपरंपरेत जसे ज्ञानोबा-तुकाराम हे जोडनाव घेतले जाते, तसेच सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या क्षेत्रात रानडे-भांडारकर हे जोडनाव आहे. या दोघांनी प्रार्थना समाजाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला,’ असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले. पुणे प्रार्थना समाजाच्या ‘चैत्रोत्सव’मध्ये ‘रानडे-भांडारकर’ या विषयावर डाॅ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, खजिनदार प्रशांत पाडवे, ज्येष्ठ सदस्य उषा शर्मा, भास्कर मुजुमदार, डॉ. शिल्पा मुजुमदार, धनराज निंबाळकर, डेक्कन कॉलेजचे डॉ. पदय्या, डॉ. सचिन नाईक, डॉ. माधवी कोल्हटकर या वेळी उपस्थित होते.

डाॅ. मोरे म्हणाले, ‘न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडे त्या काळात संत म्हणून पाहिले जायचे. तर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची संस्कृत पंडित व प्राच्यविद्या संशोधक म्हणून जगभर ख्याती होती. रानडे उत्तम निरुपणकार होते. तर, भांडारकर उत्तम कीर्तन करत असत व त्यासाठी त्यांनी पदे रचली. रागदारी संगीत शिकण्यासाठी उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची शिकवणी लावली, तसेच ते दररोज कुटुंबीयांसमवेत एकतारीवर भजने म्हणत.’ ‘ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज, तसेच सत्यशोधक समाज या सर्व चळवळी एकेश्वरवादी होत्या. त्यांनी केवळ धार्मिक विचार न मांडता, समाजसुधारणेचा व्यापक विचार मांडला. प्रार्थना समाजाने भागवत धर्मातील तत्त्वांचा स्वीकार करून ‘नव-भागवत’ तत्त्वज्ञान विकसित केले,’ असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

प्रार्थना समाज केवळ प्रार्थना करणारा समाज नव्हता, तर त्यांचा समाजसुधारणेचा आवाका फार मोठा होता. प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांचे सदस्य एकमेकांच्या कार्यात सहभागी होत असत. डाॅ. सदानंद मोरे, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ