भाजी म्हटलं, की अळू, मेथी, पालक, चाकवत, करडई, राजगिरा, चुका या पालेभाज्या आणि कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्याच ठरावीक भाज्यांची नावे आपल्याला माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा स्वाद चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वनवासी कल्याण आश्रमातर्फे भीमाशंकर अभयारण्याजवळील आहुपे येथे शुक्रवारपासून (२१ ऑगस्ट) दोन दिवस रानभाजी महोत्सव भरविण्यात येणार आहे. या महोत्सवाला भेट देणाऱ्यांना निसर्ग भ्रमंतीबरोबरच दुर्मिळ रानभाज्यांची चव चाखायला मिळणार आहे. या रानभाज्यांमध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुलं, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे, नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा अशा वेगेवगळ्या प्रकारच्या तब्बल ६५ रानभाज्यांचा समावेश होतो.
सुमारे ६००-७०० वस्तीचे आहुपे गाव सह्य़ाद्रीच्या टोकावर वसलेले आहे. येथील निसर्गरम्यता आणि आरोग्यसंपदा याची शहरी नागरिकांना ओळख व्हावी आणि फायदा व्हावा या उद्देशातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा विकास होण्यासाठी या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारंगा ही भाजी एक-दोनदा खाल्ली तरी वर्षभर पोटाचे विकार होत नाहीत. तर, रानकेळी खोकल्यावर गुणकारी असतात. ही भाज्यांच्या उपयुक्ततेची माहिती फारशी अक्षरओळख नसलेल्या या वनवासी बांधवांकडे आहे. महोत्सवामध्ये वनवासी महिला या भाज्या करून दाखविणार असून त्याची कृती आणि उपयुक्तता समजावून सांगणार आहेत. शहर आणि गावाला जोडण्याचा हा प्रयत्न असून त्यातून वनवासींना काही पैसे देखील मिळविता येतील, अशी माहिती अल्पिता पाटणकर आणि ज्ञानेश्वर वाडेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा