महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांना यंदाचा मसाप सन्मान, तर मधू नेने यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. गजलकार संगीता जोशी यांना कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार आणि कवी अशोक बागवे यांना कविवर्य ना. घ. देशपांडे पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेच्या १०९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २७ मे रोजी निवारा सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात मसापच्या सासवड शाखेस राजा फडणीस पुरस्कृत फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. इस्लामपूर येथील श्यामराव पाटील आणि सोलापूर येथील पद्माकर कुलकर्णी यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती मसाप कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वर्धापनदिन पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी सायंकाळी साडेचार वाजता दीपक करंदीकर यांच्या गीते आणि गजलांवर आधारित ‘अक्षरधुनी अक्षयधुनी’ हा कार्यक्रम राजेश दातार, गोपाळराव लिमये, राहुल घोरपडे सादर करणार असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी दिली. कोषाध्यक्ष सुनील महाजन आणि कार्यवाह नंदा सुर्वे या वेळी उपस्थित होत्या.
वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला २६ मे रोजी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते वार्षिक ग्रंथ आणि विशेष ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अभय टिळक (शं. दा. पेंडसे पुरस्कार -संतसाहित्य), शैला दातार (कृष्णराव फुलंब्रीकर पुरस्कार- संगीतसमीक्षा), डॉ. संजय ढोले (प्रा. गो. रा. परांजपे पुरस्कार- विज्ञानविषयक), प्रा. चंद्रकांत पाटील (श्रीपाद जोशी पुरस्कार- संदर्भग्रंथ), इरावती कर्णिक (कमलाकर सारंग पुरस्कार- नाटय़विषयक), डॉ. संगीता बर्वे (ग. ह. पाटील पुरस्कार- बालसाहित्य), डॉ. विजया वाड (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत लेखिका पुरस्कार) आणि भानू काळे (आशा संत पुरस्कार- संपादन क्षेत्र) हे यंदाच्या विशेष ग्रंथकार पुरस्काराचे मानकरी आहेत.
वार्षिक पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे
ल. सी. जाधव (सुंभ आणि पीळ), प्रभाकर बागले (साहित्य आणि सांस्कृतिक संवेदन), डॉ. शिवाजीराव मोहिते (संत नामदेव परिवाराची कविता), विशाखा पाटील (धागे अरब जगाचे), सुधीर फडके (एक कृषी विचार- ‘मंथन’), आ. श्री. केतकर (बृहत् भारत), प्रा. रायभान दवंगे (दप्तर), आनंद अंतरकर (घूमर), धोंडुजा इंगोले (सतत गैरहजर सबब नाव कमी), प्रा. खासेराव शितोळे (श्रीमद्भगवद्गीता) डॉ. विजया फडणीस (गोष्टी मनाच्या), मुग्धा देशपांडे (नागरिक), श्रीधर नांदेडकर (परतीचा रस्ता नाहीय), रामकृष्ण अघोर (बालजगत), नयना राजे (बाप्पांशी गप्पा), लक्ष्मीकांत देशमुख (हरवलेले बालपण), कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने (कालजयी कुमार गंधर्व), सहदेव शरद चव्हाण (अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील गावगाडा आणि जातिवास्तव), डॉ. उपेंद्र किंजवडेकर (डॉक्टर.. एक विचारू?), राजीव साने (गल्लत, गफलत, गहजब), अमृता सुभाष (एक उलट- एक सुलट), प्रभा गणोरकर (‘ईश्वर डॉट कॉम’-धर्माच्या बाजाराचे मिश्कील दर्शन), डॉ. अरुणा ढेरे (स्त्रीलिखित मराठी कथा) आणि राजहंस प्रकाशन (हे विश्वाचे अंगण).

Story img Loader