तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजानन मारणे याची साथीदारांनी जंगी मिरवणूक काढत द्रुतगतीमार्गावर एकच जल्लोष केला होता. द्रुतगतीमार्गावरील उर्से टोल नाका येथे टोल न भरता मारणे आणि त्याचे साथीदार निघून गेले. याप्रकरणी त्याच्यासह इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, फूड मॉल येथे फुकटात बळजबरी आणि मारहाण करून वडापाव, सँडविच आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन गेल्याचं निदर्शनास आले आहे. त्यानुसार याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी जंगी स्वागत करत पुणे-मुबई द्रुतगतीमार्गावर फिल्मी स्टाईल जल्लोष केला होता. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर असलेल्या उर्से टोल नाका येथे पैसे न भरता दमदाटी करून ते निघून गेले. याप्रकरणी गजा मारणे याच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फूड मॉल येथे गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी दमदाटी आणि बळजबरी करून वडापाव, सँडविच आणि पाण्याच्या बॉटल्स लुटून नेले असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाल्याने दरोड्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून 14 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, मारणे याच्यावर या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. दोन्ही गुन्हे हे शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.