मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याशिवाय अजित पवार यांना कोणताही धंदा राहिलेला नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निगडीत पत्रकारांशी बोलताना केली. निकषात न बसल्यामुळेच पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश होऊ शकला नसल्याचे सांगून त्यासाठी नऊ सप्टेंबरला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी पिंपरीत असलेल्या अजितदादांनी राज्य तसेच केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली, त्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, दानवे म्हणाले, मुख्यमंत्री दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आपणही पश्चिम महाराष्ट्रात फिरून आलो आहोत. शेतक ऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत असताना अजितदादा नाहक टीका करत आहेत. केंद्र सरकारने शेतक ऱ्यांना एका वर्षांत सात हजार कोटींची मदत केली आहे. केंद्राचे ५०० कोटी, राज्याचे ४५० कोटी असे मिळून ९५० कोटी रुपयांचे पॅकेज दुष्काळासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही राज्याच्या शिष्टमंडळाला दिली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली नाही. जे चित्र रंगवले जाते आहे, ते यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील आहे. आघाडी सरकारने केवळ घोषणाबाजी केली. आम्ही खऱ्या अर्थाने जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी करत आहोत. एलबीटी रद्द करण्याचा निर्णयाचे समर्थन करत ज्या महापालिकांना तूट येईल, ती भरून देण्याचे काम केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही दानवे यांनी दिली.

Story img Loader