दोन जणांच्या भेटण्याने जर राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल, तर या भेटीत वावगे काही नाही. राजकारणात आम्हाला कोणी अस्पृश्य नाही, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मोदी-पवार यांच्या बारामती येथे होत असलेल्या भेटीबद्दल शुक्रवारी मत व्यक्त केले.
भाजपतर्फे सुरू असलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी दानवे शुक्रवारी पुण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना मोदी आणि पवार यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने  राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. त्याच पवार यांना भेटण्यासाठी मोदी जात आहेत यावर तुमचे मत काय, अशी विचारणा केली असता मोदी आणि पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता दानवे म्हणाले, की राजकारणात आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही. दोन लोकांच्या भेटण्याने राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल, तर त्यात काही वावगे नाही.
भारतीय जनता पक्षात येण्यासाठी इतर अनेक पक्षांमधील नेते इच्छुक आहेत. आमच्या संपर्कात एकवीस माजी आमदार आणि एक विद्यमान आमदार आहे. योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करू, असेही दानवे यांनी या वेळी सांगितले. भाजप-शिवसेना युती बाबत विचारले असता दानवे म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेनेबरोबर युती करू इच्छितो. स्थानिक ठिकाणी कार्यकर्त्यांची जशी इच्छा असेल तसा निर्णय केला जाईल. कार्यकर्त्यांना युती हवी असेल, तर युती केली जाईल. तशी इच्छा नसेल, तर स्वतंत्र लढू.
भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शासनाकडून झालेली नाही याबाबत विचारले असता दानवे म्हणाले, की आमचा जाहीरनामा पाच वर्षांसाठीचा आहे. राज्यात गुंतवणुकीसाठी तेवीस कंपन्यांबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. आम्हाला जे काम करायचे आहे, त्याचे प्रतिबिंब राज्याच्या आणि केंद्राच्या येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल.
पक्षाने देशात दहा कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवले असून महाराष्ट्रात एक कोटी सदस्य नोंदवले जाणार आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत पंचेचाळीस लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. पुण्यात आठ लाख सदस्य नोंदवले जाणार आहेत, अशी माहिती दानवे यांनी दिली. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, प. महाराष्ट्राचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांची पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थिती होती.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा