पुणे : “पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला दानवे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधत स्वार्थी भाजपाला चिंचवडमधून हद्दपार करण्याचे आवाहन जनतेला केले होते. यावर दानवे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. आढावा बैठकीला भाजपा आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे: तरुणीचे अपहरण करणारे दोन तरुण गजाआड; विवाहासाठी तरुणीला डांबून जीवे मारण्याची धमकी
रावसाहेब दानवे म्हणाले की, स्वार्थी अजित पवार की आम्ही? पहाटेची शपथ आमच्यासोबत घेऊन अजित पवारांनी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. गणिते जुळत नसल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली. मागे वसंतदादा सोबत हातमिळवणी केली. मग सांगा आम्ही स्वार्थी की अजित पवार? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, आम्ही कोणासोबतही गेलो तरी भाजपाचे मूळ विचार आहेत त्याला फाटा देत नाहीत. स्वार्थी आम्ही की ते, हे चिंचवड पोटनिवडणुकीत नागरिक दाखवून देतील, असे दानवे यांनी सांगितले. मोडतोडीचे राजकारण कोणी केले? मोडतोड तर त्यांनी केली आमचे असलेले त्यांनी मोडले. त्यांचे आम्ही मोडले तर फरक काय पडला? असेही ते म्हणाले.
हेही वाचा – पुणे : पेठा, मध्यवर्ती भागासह काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
शिवसेनेच्या चिन्हाबाबत सौदा झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेना चिन्हाबाबत दोन हजार कोटींचा सौदा झाला, असा असरोप संजय राऊत यांनी केला. यावर कोर्ट निर्णय देईल. आम्ही आणि ते कोर्टात जाणार आहोत. दोन हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला? भाजपाने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्टीकरण दिले.