पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रीत करण्यात आलेल्या रॅप गाण्यात आक्षेपार्ह शब्द असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. शिव्यांचा भडीमार असलेल्या गाण्यासाठी विद्यापीठाने परवानगी कशी दिली याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
सल्तनत नावाचे गाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पार्श्वभूमीवर आणि अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात मद्य, पिस्तुल, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. रॅप शैलीच्या या गाण्यात शिव्या आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. सांस्कृतिक पुणे शहरात कलागुणांना वाव दिला पाहिजे हे मान्य करू शकतो.
हेही वाचा >>> पुणे : मुलाखती संपल्यावर तासाभरातच कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
मात्र कलागुणांच्या नावाखाली शिव्यांचा भडीमार, अश्लीलतेचा उच्चांक गाठला जाणार असेल आणि त्यासाठी पवित्र असे विद्येचे केंद्र असणाऱ्या, पूर्वेकडचे ऑक्सफर्ड बिरूद मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचे दालन उपलब्ध करून देणे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच या गाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी कशी दिली याचा खुलासा करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान अशा कोणत्याही गाण्याच्या चित्रीकरणासाठी विद्यापीठाने परवानगी दिलेली नाही. परवानगी न घेता चित्रीकरण केल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिले.