Pune Rape-Murder Case : दोन अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका ५४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या घटनेत ८ आणि ९ वर्षीय दोन बहि‍णींची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्यावरून संतापाची लाट उसळली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि पीडित मुलींच्या शेजारीच राहतो, तसेत तो मुलींच्या कुटुंबियांना देखील ओळखत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या दोन मुलींचे मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील एका खोलीत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ड्रममध्ये आढळून आले होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

बुधवारी सकाळी घराजवळ खेळत असलेल्या मुली सापडत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीचे वडील सफाई कर्मचारी म्हणून काम करतात तर आई मजूर आहे.

हेही वाचा>> बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक…

पोलिसांनी आरोपीविरोधा पुणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बाललैंगिक गुन्हे प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा उत्तर भारतात कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला एका लॉजमधून अटक करण्यात आली अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

“अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे”, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने कथितरित्या आधी वयाने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावून आलेली मोठी बहीण देखील त्याच्या तावडीत सापडली. आरोपीने दोन्ही पीडित मुलींची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये फेकले, असेही पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape and murder of 2 minor sisters in pune district 54 year old neighbour arrested marathi crime news rak94