बारामती येथील एका व्यावसायिकाच्या मुलीचे अपहरण करून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर पाच साथीदारांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पवनकुमार कमलेशकुमार अगरवाल (वय २५, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पाच साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत बारामती येथील २२ वर्षांच्या पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीच्या वडिलांसोबत आरोपी व त्याचे वडील व्यवसाय करतात. त्यामुळे आरोपी हा तरूणीला ओळखत होता. तरूणीचे आई-वडील हे एका नातेवाइकाच्या लग्नाला गेले असता आरोपीने एके दिवशी ‘तू मला खूप आवडतेस. आपण पळून जाऊन लग्न करू. तू नाही आलीस तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. आई-वडील नसल्यामुळे तरूणीने हा प्रकार तिच्या काकूंना सांगितला. दुसऱ्या दिवशीच आरोपीच्या साथीदारांनी तरूणीला रस्त्यात अडवून छेड काढली. पवनकुमारची गोष्ट मानली नाही तर तुला खूप त्रास सहन करावा लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर तरूणी बारामती बाजार येथे खरेदीसाठी गेली असता तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्यांच्याकडे तुला सोडतो म्हणून मोटारीत बसविले. मात्र, मोटारीत बसल्यानंतर एक महिला व चार व्यक्ती असल्याचे आढळले. पवनकुमार खोटे बोलत असल्याचे समजले. पण, त्याने चाकूचा धाक दाखविल्यामुळे तिला गप्प बसावे लागले. तिला इंडिका मोटारीतून आळंदी येथे नेले. या ठिकाणी कोऱ्या कागदावर तिच्या सह्य़ा घेऊन दोघांचे जबरदस्तीने फोटो काढले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन शिरुर येथील एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर पुण्यात बुधवार पेठेतील एका लॉजवर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मीर अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मोबाईल लोकेशन वरून त्यांचा शोध घेतला. पण, सुरूवातीला समाजातील प्रतिष्ठा जाईल म्हणून आई-वडिलांनी तक्रार दिली नाही. पण तरूणीने नंतर न्यायालयात खासगी खटला दाखल केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा