भोसरी येथे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीस वर्षांच्या मतिमंद तरूणीवर वॉर्ड बॉयने लिफ्टमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी वॉर्डबॉयसह त्याला मदत करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
प्रमोद मनोहर मांडेकर (वय २८, रा. फुगे- माने आळी, भोसरी) आणि शैलेश दगडू जाधव (वय ३९, रा. नर्सेस क्वार्टर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मांडेकर हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतो, तर जाधव हा सुरक्षारक्षक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी मतिमंद असून ती मोशीतील एका संस्थेत राहते. गेल्या सोमवारी चक्कर येऊ लागल्यामुळे तरूणीला उपचारासाठी भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी मांडेकर याने सुरक्षारक्षक जाधव याच्या मदतीने पीडित तरुणीला जबरदस्तीने रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये नेले. या ठिकाणी मांडेकर याने बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरूणीने हा प्रकार तिच्या ओळखीच्या महिलेला सांगितला. तिने याबाबत रुग्णालयातील इतरांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. तरूणीची वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या तरूणीने दोघांनाही ओळखले आहे. या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ सप्टेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. आर. नांदेकर हे अधिक तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा