लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार, तसेच तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण वडगाव बुद्रुक भागातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा आहे.
याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी तरुण वडगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. त्याची आई भारतीय जनता पक्षाची माजी नगरसेविका असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची २०२१ मध्ये व्यायामशाळेत ओळख झाली होती. पीडित तरुणीचा व्यवसाय आहे. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तो तिला भेटण्यासाठी घरी जायचा. तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. आरोपीचे अन्य तरुणींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करुन धमकावले. त्याने तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तरुणीने या प्रकाराची माहिती आईला दिली. १७ डिसेंबर २०२२ रोजी तरुणाने तिच्या मोबाइलवर संपर्क साधला. मला शेवटचे भेटायचे आहे. नाही भेटली तर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकू, अशी धमकी त्याने दिली. या घटनेची माहिती तरुणीने माजी नगरसेविकेला दिली. तेव्हा तिला पुन्हा धमकावण्यात आले. आरोपी तरुण पुन्हा तिला भेटला. मी तुझ्याबरोबर विवाह करणार आहे, असे त्याने तिला सांगितले.
विवाहाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांचा विवाहास नकार आहे. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे सांगून त्याने तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने तरुणीला आमिष दाखवून बलात्कार केला. तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. तरुणीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. विवाहाबाबत विचारणा केल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपीने तरुणीला आळंदीत नेले. तेथे तिच्याशी विवाह केला. गर्भवती असल्याची माहिती असताना त्याने पुन्हा बलात्कार केल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने तिला पुन्हा पाण्यातून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. तरुणी घाबरून अहिल्यानगरला आजीकडे गेली. १३ मार्च रोजी ती पुण्यात परतली आणि तिने पोलिसांकडे तक्रार दिली.