लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी जामीन मंजूर केला. आरोपी आणि तक्रारदार नगरसेविकेचे पाच वर्षे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी सहमती संबंध प्रस्थापित केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
सचिन काकडे (वय ४३, रा. संतोषनगर कात्रज) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. काकडे याने मैत्रीचा गैरफायदा घेऊन नगरसेविकेबरोबर छायाचित्रे काढली होती. छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने बलात्कार केला. त्याने नगरसेविकेकडे महिलेकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास पतीला संबंधाबाबत माहिती देतो, असे सांगून नगरसेविकेकडून दहा लाख रुपये घेतले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी काकडे तिच्या घरी गेला. तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. काकडेच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या माजी नगरसेविकेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर काकडेला अटक करण्यात आली.
आणखी वाचा-पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई, महापालिकेची विशेष पथके तैनात
काकडेच्या वतीने ॲड. राकेश सोनार यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. माजी नगरसेविकेने खोटी तक्रार दिली आहे. तिचे आणि काकडेचे प्रेमसंबंध होते. व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले. काकडेने वाद मिटवून घ्यावेत, यासाठी माजी नगरसेविकेने पोलिसांकडे तक्रार दिली, असा युक्तीवाद ॲड. सोनार यांनी केला. काकडेला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती ॲड. सोनार यांनी युक्तीवादात केली. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरुन काकडेला जामीन मंजूर केला.