सिंहगड रस्त्यावरील घटना; रिक्षाचालकाचा शोध सुरू

सहा आसनी रिक्षा चालकाने प्रवासी युवतीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता भागात घडली. युवतीने रिक्षातून उडी मारल्याने तिला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली.

या बाबत तेवीस वर्षीय युवतीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सहा आसनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तक्रारदार युवती नृत्य प्रशिक्षण घेत आहे. पुणे स्टेशन भागात वर्ग आहे. शुक्रवारी रात्री ती स्वारगेट परिसरातून सहा आसनी रिक्षातून धायरीला जात होती. सहा आसनी रिक्षात प्रवासी होते. हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात युवती एकटीच होती. रिक्षा चालकाने सिंहगड रस्त्याने धायरीच्या दिशेने रिक्षा नेणे अपेक्षित होते. मात्र, रिक्षा चालकाने सिंहगड रस्त्याजवळ असलेल्या कालव्याच्या रस्त्याने रिक्षा नेली.

कालव्याच्या रस्त्याने रिक्षा चालक पुन्हा सिंहगड रस्ता भागात आला आणि मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गाच्या दिशेने रिक्षा नेली. त्यामुळे युवतीला संशय आला. तिने रिक्षा चालकाला रिक्षा कुठे चालविली आहे? अशी विचारणा केली. तेव्हा माझे नऱ्हे भागात काम आहे. दहा मिनिटांत धायरीत सोडतो, असे रिक्षा चालकाने सांगितले. त्यामुळे युवतीने गोल्ड जिमजवळ रिक्षा चालकाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रिक्षा चालकाने युवतीने चेहऱ्यावर गुंडाळलेला रुमाल ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तिने रिक्षातून उडी मारली. त्यानंतर तिने तिच्या मित्राच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या युवतीने खासगी रुग्णालयात  उपचार घेतले. शनिवारी तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड तपास करत आहेत.

गुन्हा दाखल पण कमालीची गोपनीयता

युवतीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सहा आसनी रिक्षा चालकाचे वर्णन दिले. रिक्षा चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, अपहरण आणि विनयंभगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगून याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू दिली नाही.