लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ तसेच समाजमाध्यमात महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दयानंद निळोबा फंड, विश्वजीत दयानंद फंड, नारायणी विवेकानंद फंड, रेणुका वाडकर (सर्व रा. शिरुर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि आरोपी दयानंद फंड यांची ओळख होती. आरोपी फंडने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले होते. महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा महिलेची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली.
आणखी वाचा- पुणे: वडगाव शेरीत रंगाच्या गोदामाला आग; तासाभरात आग आटोक्यात
आरोपी दयानंदने महिलेच्या बँक खात्याचा गैरवापर करुन तिची आर्थिक फसवणूक केली. दयानंद फंड याच्या घरी जाऊन महिलेने जाब विचारला. तेव्हा तिला जातीवाचक शिवीगाळ करुन अपमानित करण्यात आले. महिलेने याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर तपास करत आहेत.