लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: डॉक्टरकडून तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी पीडीत रुग्ण महिलेकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉक्टरला अटक केली.

डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय पीडीत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. दबडे यांचे कात्रज भागातील मांगडेवाडी भागात कल्पनानंद क्लिनीक आहे. पीडित रुग्ण महिला डॉ. दबडे यांच्या रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. त्या वेळी त्यांची ओळख झाली. डॉ. दबडे यांनी महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर डॉ. दबडे यांनी गोड बोलून पुन्हा रुग्णालयात बोलावले. डॉ. दबडे यांनी मला धमकावून बलात्कार केला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

डॉ. दबडे यांनी पाठलाग करुन त्रास दिला. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.

Story img Loader