पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत अत्याचार प्रकरणातील पीडितांना मदत करण्यात येते. बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर रोजी मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शाेध घेण्यात येत आहे. ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित तरुणीने विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. अर्ज आल्यानंतर नऊ दिवसांत संबंधित अर्ज मंजूर करून पीडित तरुणीला दिलासा देण्यात आला.
हेही वाचा >>> बिष्णोई टोळीच्या नावे सराफ व्यावसायिकाकडे दहा कोटींची खंडणीची मागणी, पोलिसांकडून तपास सुरू
नुकसान भरपाईपोटी मिळणारी २५ टक्के रक्कम तरुणीला रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम दहा वर्षांसाठी पीडित तरुणींच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून ती उपचार घेऊ शकते, तसेच दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मदत होणार आहे.
हेही वाचा >>> बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
मनोधैर्य योजना म्हणजे काय?
पीडित बालक किंवा महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत असते. पीडित महिलेला कमीत कमी ३० हजार रुपयांपासून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते. पीडित महिलांना आधार आणि धैर्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित अर्ज निकाली काढण्यात आला. पीडित तरुणीने ११ ऑक्टोबर रोजी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तो १९ ऑक्टोबर रोजी निकाली काढण्यात आला, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी नमूद केले.