भगवान श्रीविष्णूचे वर्णन करणारे विष्णूसहस्रनाम हे आपल्या सर्वाना माहीत आहे. याच धर्तीवर वारक ऱ्यांचा देव असलेल्या श्रीविठ्ठलाचे स्वरूपवर्णन करणारे ‘विठ्ठलसहस्रनाम’ही आता उजेडात आले आहे. संस्कृतमधील या हस्तलिखितामध्ये विठ्ठलाच्या एक हजार नावांचा समावेश असून हे हस्तलिखित भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथलयामध्ये सापडले आहे.
मराठी हस्तलिखित केंद्राचे प्रमुख वा. ल. मंजूळ यांना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या हस्तलिखित संग्रहामध्ये हे छोटेखानी हस्तलिखित सापडले. या हस्तलिखिताचा अभ्यास केल्यानंतर हे विठ्ठलसहस्रनाम असल्याचे ध्यानात आले. संस्कृतमध्ये रचलेले हे सहस्रनाम भाषाशास्त्र, परंपरा आणि दैवतशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. हरिदास नावाच्या लेखकाने या विठ्ठलसहस्रनामाची रचना केली. मात्र, हा हरिदास कोण आणि कुठला याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. विठ्ठलसहस्रनाम हे संस्कृत भाषेमधील दोनशे श्लोकांचा समावेश असलेले हस्तलिखित आहे. भांडारकर संस्थेमध्ये हे हस्तलिखित १९२० मध्ये आले असल्याचा उल्लेख आहे. लेखनपद्धती आणि संदर्भ ध्यानात घेता विठ्ठलसहस्रनामाची रचना १८८५ च्या सुमारास झाली असावी असा निष्कर्ष ढोबळमानाने काढता येऊ शकेल, असे मंजूळ यांनी सांगितले.
हे हस्तलिखित सापडले कसे याचा प्रवासही रंजक आहे. ब्रिटिशांनीच भारतीय संस्कृतीचा ठेवा असलेल्या हस्तलिखितांच्या संकलनासाठी काही विद्वानांची नेमणूक केली होती. त्यापैकी एका विद्वानाला हे विठ्ठलसहस्रनामाचे बाड मिळाले. ते प्रथम तत्कालीन मुंबई इलाख्यात, नंतर डेक्कन कॉलेजमध्ये आणि तेथून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे आले. भांडारकर संस्थेच्या स्थापनेनंतर तीन वर्षांतच हे हस्तलिखित संस्थेकडे आले. या हस्तलिखितातील विठ्ठलाची नावे कृष्णलीलांशी जवळीक साधणारी आहेत. वृंदावन, गोप-गोपी, गोकुळ याचे उल्लेख असून द्वारकेश्वर, मुरलीधर, गिरीधर, कमलाबंधूसुखदा, पद्मावतीप्रिय नमो नम:, गोपीजनलवल्लभा अशी श्रीकृष्णवाचक नामे या विठ्ठलसहस्रनामात आढळतात, असेही मंजूळ यांनी सांगितले. पद्मपुराणातील विठ्ठलसहस्रनाम १६८ श्लोकांचे असून ते छापील स्वरूपात प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हे हस्तलिखित अद्याप अंधारातच असल्याने ग्रंथरूपामध्ये उपलब्ध नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा