दोह्य़ामध्ये मराठी संतांचे वर्णन
देखो भाई पंढरपूर में क्या क्या बात चलती है
विठ्ठल राजा जमाव फौजा साधूसंतन आती है
श्री विठ्ठल आणि त्यांची भक्त मंडळी यांच्यासह पंढरपूर यात्रेचे वर्णन करणारे अज्ञात दोहा असलेले दुर्मीळ हस्तलिखित नुकतेच सापडले आहे. मात्र, हा दोहा कबीराच्या शैलीप्रमाणे असला तरी तो कबीराचाच आहे की नाही यावर नेमकेपणाने प्रकाश पडू शकत नाही.
पंढरपूरमधील मराठी हस्तलिखितांचा धांडोळा घेताना एक बाड दुर्मीळ हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना नुकतेच सापडले. या बाडामध्ये हे छोटेखानी या दोह्य़ाचे उभे हस्तलिखित आहे. त्यामध्ये कबीराचा श्री विठ्ठल आणि त्यांची भक्त मंडळी यांच्यावरील हा अज्ञात दोहा सापडला आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंजूळ म्हणाले, संत कबीर यांनी स्वामी रामानंद आणि संत नामदेव यांना आदर्श ठेवून परखड वाणीने जनजागरण घडविले. श्री क्षेत्र पंढरपुरात संत कबीरांचा मठ १८५० मध्ये स्थापन झाला. या मठामध्ये कडू महाराज, कमाल महाराज, रघुनाथ आणि साम महाराज यांची समाधी आहे. मठाचे कुलदैवत श्रीराम असून आनंद संप्रदायाचे आहेत. पंढरपुरात विठ्ठल भक्ती होत असून या मठामध्ये अडीचशे वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरी आहे. विष्णू सदाशिव कबीर हे विद्यमान मठाधिपती आहेत. दुर्मीळ हस्तलिखित या स्वरूपात हा दोहा सापडला आहे. या काव्यामध्ये पंढरपूर यात्रेचे वर्णन आहे. तसेच संत तुकारामांचे वर्णन आहे. हे संदर्भ नंतरच्या काळातील आहेत. त्यामुळे हा दोहा कबीराचा आहे की त्यानंतर कोणी त्यांच्या नावे लिहिला असावा अशी शंका वाटते. तरी पण मठाच्या स्थापनेला आणि विठ्ठलभक्तीची परंपरा सुरू होण्याला पावणेदोनशे वर्षे होत आली असताना हा दोहा आढळून आला आहे.