सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीची प्राचीन नाणी, मुघलकालीन नजराणा, एरर अशा वेगवेगळ्या कालखंडातील दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांचा खजिना अनुभवण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स संस्थेतर्फे गुरुवारपासून (१० डिसेंबर) तीन दिवस ‘कॉइनेक्स पुणे २०१५’ हे राष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता मुंबई येथील तोडीवाला ऑक्शनचे मालक आणि प्रसिद्ध नाणक संग्राहक फारुकभाई तोडीवाला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नाणकशास्त्रातील पितामह पुखराजभाई सुराणा आणि सोसायटीचे माजी अध्यक्ष काशिनाथ पंडित यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नव्याने गिनिज रेकॉर्ड होल्डर झालेले सोसायटीचे त्रिवेंद्रम येथील डॅनियल मोन्टँरिओ यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुणेरी पगडीच्या स्पेशल कव्हरचे उद्घाटन पुण्याचे पोस्टमास्तर जनरल गणेश सावलेश्वरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप सोहोनी यांनी दिली.
प्रदर्शनात शुक्रवारी (११ डिसेंबर) बाराशेहून अधिक आयटेम्सचा लिलाव होणार आहे. या निमित्ताने दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्री करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तुमच्याकडे असलेल्या नाण्यांची ओळख करून त्याची अंदाजे किंमत, त्याचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याचेही सोहोनी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा