विणीच्या हंगामात आक्र्टिकच्या बर्फाळ भागात राहणारा आणि उर्वरित बहुतेक काळ समुद्रात राहणारा ‘रेड फालोरोप’ हा दुर्मीळ पक्षी भिगवण येथे उजनी जलाशयात दिसला आहे. स्थलांतरणाच्या वेळी रस्ता चुकून हा पक्षी थव्यातून बाहेर पडला असावा, असा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे. देशात यापूर्वी हा पक्षी आढळल्याच्या फारशा नोंदी नसल्यामुळे पुण्याजवळ तो दिसणे ही दुर्मीळ बाब मानली जात आहे.
वन्यजीव छायाचित्रकार व पक्षी अभ्यासक राहुल सचदेव यांच्यासह संगमेश्वर धत्तर्गी, जनकराजन सरवानन व श्रीहरी के या छायाचित्रकारांच्या चमूने १८ मार्चला उजनी जलाशयात हा पक्षी पाहिला. परंतु ‘रेड नेक फालोरोप’ असाही एक पक्षी असून त्याच्यात व या पक्ष्यात खूप साम्य असल्यामुळे प्रथमदर्शनी तो ‘रेड नेक फालोरोप’च असावा, असे वाटले. नंतर या पक्ष्याची छायाचित्रे पाहून पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी तो ‘रेड नेक’ नव्हे तर ‘रेड फालोरोप’ पक्षी असल्याचे सांगितले. छायाचित्रकार राहुल उंब्रजकर यांनी ही माहिती दिली.
‘‘या दोन प्रजातींचे पक्षी सारखे दिसत असले तरी विणीच्या हंगामात एप्रिल ते जुलै दरम्यान ‘रेड नेक’ची मान लाल रंगाची दिसते, तर ‘रेड फालोरोप’चे संपूर्ण अंग लाल दिसते. इतर काळात हे पक्षी पांढरे व एकसारखेच दिसू लागतात,’’ असे शिवकर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘ ‘रेड फालोरोप’ पक्ष्याची चोच थोडी जाडसर असून त्याच्या तळाशी पिवळा रंग असतो व या प्रमुख फरकावरुन पक्षी ओळखता येतो. आपल्याकडे ‘रेड नेक फालोरोप’ गुजरात, मुंबई, तमिळनाडू येथे दिसतो. परंतु ‘रेड फालोरोप’ दुर्मीळ असून तो चौथ्यांदा वा पाचव्यांदाच दिसतो आहे.’’
‘रेड फालोरोप’ यापूर्वी २०१२ मध्ये राजस्थानला, २०१३ मध्ये नागपूर व हैद्राबादला व २०१४ मध्ये अमरावतीला दिसल्याच्या नोंदी आहेत.