पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास चहुबाजूने विरोध झाल्याने सत्तारूढ राष्ट्रवादीने यासंदर्भात घाईने निर्णय घेण्याचे धाडस केले नाही. सोमवारी झालेल्या पालिका सभेत हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विकास हवा असल्यास समाविष्ट व्हा, असे फर्मान सोडले होते. मात्र, आधीच्या गावांच्या दुरवस्थेचे दाखले देत विरोधकांसह राष्ट्रवादीच्या मंडळींनी देखील पिंपरीत येण्यास नकारघंटा दर्शविली आहे. त्यामुळे रेटून निर्णय घेण्याची नेहमीची भूमिका न ठेवता राष्ट्रवादीने थोडे सबुरीने घेतले आहे.
देहू, आळंदी, चाकण, हिंजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे िपपरी पालिकेत समाविष्ट करण्याचा विषय शहर सुधारणा समितीत बरेच दिवस रखडवण्यात आला होता. सोमवारी पालिका सभेत त्यावर निर्णय होणार होता. मात्र, कोणतीही चर्चा न होता तो प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबतचे आदेश सदस्यांना देण्यात आले होते. यासंदर्भात गावकऱ्यांच्या तीव्र विरोधाची दखल घेत महापौरांनी हा विषय लांबणीवर टाकला आहे.
पिंपरी पालिकेत येण्यास या गावांचा विरोध असून तसे ठराव करून ग्रामपंचायतींनी राज्यशासनाकडे पाठवले आहेत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, भाजपचे आमदार बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते, हिंजवडीचे सरपंच सागर साखरे आदींनी गावांचा समावेश करण्यास यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तीच भूमिका घेतली आहे. हिंजवडीची स्वतंत्र नगरपालिका करून त्यात माण, मारूंजी, नेरे, कासारसाई, जांबे व हिंजवडीचा समावेश करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. पिंपरी पालिकेचे सर्वेसर्वा अजितदादा गावे पिंपरीत समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहेत. विकास हवा असेल तर पालिकेत या, असे आवाहन त्यांनी वेळोवेळी केले आहे. तथापि, विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही तीव्र विरोध दर्शवल्याने त्यांची अडचण झाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर शासनाने हा विषय चर्चेला आणल्याने त्याचे राजकारण होणार, हे उघड गुपित आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे घाई न करता राष्ट्रवादीने हा विषय सबुरीने घेण्यासाठी तूर्त लांबणीवर टाकल्याचे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा