Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीत प्रबोधन मंचाची कामगिरी ‘गेम चेंजर’

भाजपसाठी सकारात्मक आणि नकारात्मक असे वर्गीकरण करून सकारात्मक असलेल्या मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

rashtriya swayamsevak sangh played powerful role for bjp in maharashtra assembly elections
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ कामगिरी केली आहे image : loksatta team

पुणे : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ कामगिरी केली आहे. प्रबोधन मंच या नावाने स्वयंसेवकांनी धर्म, हिंदुत्व आणि विकास अशा मुद्द्यांवर राज्यभरात विविध समाजघटकांमध्ये पोहोचून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या कामाचे फळ महायुतीच्या महाविजयाच्या रूपाने मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘प्रबोधन मंचा’च्या माध्यमातून राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निश्चित केले. ऑगस्टपासून या दृष्टीने काम सुरू करण्यात आले. हिंदू, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) अशा विविध समाजघटकांसाठी नॅरेटिव्ह तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी पुस्तके तयार करून ती स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्या स्वयंसेवकांचे प्रबोधन, प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षित स्वयंसेवकांनी पुढे आणखी लोक जोडले. प्रत्येक बूथची यादी घेऊन त्याचे वर्गीकरण करण्यात आले. भाजपसाठी सकारात्मक आणि नकारात्मक असे वर्गीकरण करून सकारात्मक असलेल्या मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मताधिक्यात मोठी वाढ

विकास, हिंदुत्व अशा मुद्द्यांवर त्यांच्याशी सातत्याने संवाद, संपर्क साधण्यात आला. त्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आला. व्हॉट्सॲप समूह तयार करण्यात आले. दृक्श्राव्य चित्रफिती, बातमीपत्रे दररोज पोहोचवण्यात आली. त्या दृष्टीने हिंदुत्व, विकास, धर्म अशा विविध विषयांवर कोणी बोलायचे हे निश्चित करण्यात आले. त्याचे कार्यक्रम शिक्षण, सहकार, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील संस्थांमध्ये करण्यात आले. यातून आठ ते दहा टक्के मतदान वाढवण्याचे, भाजपच्या १३० जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यासाठीही काम करण्यात आले, अशी माहिती ‘प्रबोधन मंचा’शी संबंधित सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> Chinchwad and Maval Vidhan Sabha : चर्चा तर होणारच; भाजपचे शंकर जगताप १ लाख, तर सुनील शेळके १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजयी

मतदानाच्या दिवशी राज्यभरात मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. तर, निकालामध्ये भाजपच्या १३०पेक्षा जास्त जागा निवडून आल्या. तसेच, महायुतीलाही मोठा विजय मिळाला. त्यामुळे केलेले काम यशस्वी ठरले आहे. आता अशाच पद्धतीने कायमस्वरूपी काम करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ‘प्रबोधन हे समाजात कायमस्वरूपी करण्याचे काम आहे. निवडणुकीतील मतदानाचा घटता टक्का चिंताजनक आहे. त्यामुळे प्रबोधनाच्या माध्यमातून मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हा देश हिंदुत्वाच्या आधारे उभा राहिलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा भाव कायम राहावा, समाजात सामाजिक सौहार्द टिकून राहावे या दृष्टीने जागृतीचे काम करण्यात आले. जातीपातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे जे फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आले होते, त्याला हिंदुत्वाने उत्तर देण्यात आले,’ असे ‘प्रबोधन मंचा’चे राज्य संयोजक हरिभाऊ मिरासदार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashtriya swayamsevak sangh played powerful role for bjp in maharashtra assembly elections pune print news ccp 14 zws

First published on: 23-11-2024 at 20:05 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या