संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य असलेले व पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेले पुण्यातील भंडारा व भामचंद्र या डोंगरांच्या संरक्षणासाठी वारकरी रस्त्यावर येणार आहेत. या डोंगरांची सुरू असलेली लचकेतोड थांबवून संपूर्ण डोंगर संरक्षित करण्याच्या मागणीसाठी पुणे-मुंबई रस्त्यावर सोमाटणेफाटा येथे शुक्रवारी (२८ जून) रस्ता अडविण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्यातील विविध वारकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
भंडारा व भामचंद्र डोंगर संपूर्ण संरक्षित करण्याबाबत २०११ मध्ये अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यात बदल करून काही भाग वगळण्यात आला आहे. या वगळलेल्या भागात डोंगर फोडण्यात येत आहे. त्यामुळे वारकरी संघटनानांमध्ये नाराजी आहे. याबाबत समस्त वारकरी समाज व संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आंदोलन जाहीर केले आहे. या समितीचे मधुसूदन पाटील महाराज यांनी सांगितले, की भंडारा व भांमचंद्र डोंगर २०११ च्या अधिसूचनेप्रमाणे माथ्यापासून पायथ्यापर्यंत संपूर्ण संरक्षित करावेत. त्यांच्यावर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून त्यांच्या कडेने संरक्षक भिंत बांधण्यात यावी. संरक्षित क्षेत्रातून डोंगराचा काही भाग वगळण्याबाबत अंतिम अधिसूचना अजून निघायची आहे. त्याआधीच तिथे अतिक्रमणे व डोंगर फोडण्याची कामे सुरू झाली आहेत. ती तातडीने थांबवावीत, अशी आणखी मागणी आहे. हे भाग वगळणे हेही वारकऱ्यांना मान्य नाही. घोराडेश्वरचा डोंगर पुरातत्त्व विभागाने संपूर्ण संरक्षित केलेला आहे. त्याचप्रमाणे भंडारा व भामचंद्र डोंगर संरक्षित व्हावेत.
त्याचबरोबर भंडारा डोंगरावर तुकोबांनी बांधलेले प्राचीन मंदिर होते. ते धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीविना पाडण्यात आले, आता तिथे नवे मंदिर उभारण्यात येणार आहे. मात्र, हे प्राचीन मंदिर पाडणाऱ्यांवर आधी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या मागण्यांसाठीच शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे. त्याला वारकऱ्यांच्या विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader