कष्टकऱ्यांना दरमहा किमान दोन हजार रुपये पेन्शन व स्वस्त दरात रेशन पुरवठय़ाच्या मागणीसाठी सोमवारी पेन्शन, रेशन मागणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेनंतर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटनेसह ३७ विविध संघटनांनी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करून या मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर डॉ. आढाव यांच्यासह शेकडोहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
मार्केट यार्ड भागामध्ये डॉ. आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन, रेशन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कष्टकरी महिलांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मेधा थत्ते, नितीन पवार, संजय साष्टे, संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे, राजेंद्र धारगे, पूर्णिमा चिकरमाने, अनंत कुडले, सूर्यकांत चिचवले, विलास थोपटे, शशिकांत नांगरे आदींनी परिषदेमध्ये सहभाग घेतला.
कष्टकरी व कामगारांसाठी विमा योजना व पेन्शन देण्याची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. त्याबाबत पेन्शन योजनाही लागू करण्यात आली असली, तरी राज्य शासनाकडून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी परिषदेनंतर दुपारी एकूण ३७ संघटनांचे कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी  पुणे-सातारा रस्त्यावर भापकर पेट्रोल पंप येथे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. काही काळ आंदोलन केल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्वाची सुटका करण्यात आली.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, की केवळ निवडणुकांच्या वेळी सरकारला कामगारांची आठवण होते. राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे लाखो कष्टकरी व कामगारांना हलाखीचे दिवस पाहावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलणाऱ्या कष्टकरी व कामगारांच्या संघटनांनी एकत्र आले पाहिजे. कष्टकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर दिल्लीतही आंदोलन केले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा