रतन टाटा यांनी ‘टाटा मोटर्स’ला जागतिक पातळीवर पोहोचविले. वाहननिर्मिती क्षेत्रातील ते सर्वांत मोठे नाव बनले. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात या कंपनीचा विस्तार झाला. टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘टाटा मोटर्स’ने अनेक अनोख्या मोटारी सादर केल्या. त्यातील ‘इंडिका’ आणि ‘नॅनो’ या मोटारी बहुचर्चित ठरल्या. प्रवासी वाहन क्षेत्रात सध्या ‘टाटा मोटर्स’ ही प्रमुख कंपनी बनली आहे.
‘टाटा इंडिका’
‘टाटा इंडिका’ १९९८ मध्ये ‘ऑटो एक्स्पो’मध्ये सादर करण्यात आली. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही मोटार होती. भारतीय ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन या मोटारीची रचना करण्यात आली होती. त्या वेळी कुटुंबासाठीची मोटार असे तिचे वर्णन करण्यात आले. या मोटारीत पुरेशी जागा, स्टाईल आणि परवडणारी किंमत या सर्व गोष्टी होत्या. त्या वेळी भारतीय ग्राहकांकडे मोटारींसाठी फारसा पसंतीला वाव नव्हता. प्रामुख्याने परदेशी मोटारी आणि त्याआधारित बनविलेल्या भारतीय मोटारीच अधिक दिसत. सुरुवातीला ‘इंडिका’ला अनेक अडथळे पार करावे लागले. तिच्यावर टीकाही झाली; परंतु, ही मोटार भारतीयांच्या पसंतीला उतरली. रतन टाटा यांनी आपल्या मतावर ठाम राहून ‘इंडिको’च्या माध्यमातून देशातील मोटारींचे हे चित्र बदलले.
आणखी वाचा-रतन टाटा, त्यांचे टँगो, टिटो अन् लालबागचा मी…
टाटा नॅनो
रतन टाटा यांनी ‘टाटा नॅनो’चा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात मोटार उपलब्ध व्हावी, असा त्यांचा हेतू होता. दुचाकीला सुरक्षित पर्याय देण्याचाही विचार यामागे होता. ही मोटार २००८ मध्ये ‘ऑटो एक्स्पो’त सादर करण्यात आली. या मोटारीची किंमत केवळ १ लाख रुपये होती. मात्र, या मोटारीवर गरिबांसाठीची मोटार असा शिक्का बसल्याने तिच्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे या मोटारींचे उत्पादन ‘टाटा मोटर्स’ला बंद करावे लागले. अखेर खुद्द रतन टाटा यांनी मोटारीची जाहिरात करण्यात चूक झाल्याची कबुली दिली होती.
जॅग्वार लँड रोव्हर
‘टाटा मोटर्स’ने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘जॅग्वार लँड रोव्हर’ ही कंपनी ताब्यात घेतली. ब्रिटनमधील प्रसिद्ध आणि अतिशय जुनी अशी ही कंपनी होती. हा व्यवहार तब्बल २.३ अब्ज डॉलरचा होता. यामुळे ‘टाटा मोटर्स’चा जागतिक पातळीवर विस्तार झाला. या निमित्ताने प्रीमिअम आणि लक्झरी मोटारींच्या क्षेत्रात ‘टाटा मोटर्स’चा प्रवेश झाला. ‘टाटा मोटर्स’ आलिशान मोटारींचे उत्पादन करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला रतन टाटा यांनी या निमित्ताने उत्तर दिले.
आणखी वाचा-जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात…
इलेक्ट्रिक स्थित्यंतर
नावीन्यपूर्ण संशोधन आणि शाश्वत विकासाला रतन टाटांनी कायम प्राधान्य दिले. यातून त्यांनी ‘टाटा मोटर्स’ला इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची दिशा दाखवली. त्यातून ‘टाटा मोटर्स’ने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटारींच्या उत्पादनावर भर दिला. ‘टाटा मोटर्स’ने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटारींची अनेक मॉडेल सादर केली आहेत. त्यामुळे या मोटारींच्या बाजारपेठेत कंपनी आघाडीवर आहे. यातून रतन टाटांची भविष्यवेधी वृत्ती आणि वाहन उद्योगाच्या बदलांची जाण दिसून आली.