शिधापत्रिकेची प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय; दलालांना आळा बसण्याची शक्यता
पुरवठा विभागातील दलालांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शिधापत्रिका तसेच शिधापत्रिकेमधील नावाची दुरुस्ती करण्यासाठी स्वॉफ्टवेअर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने शिधात्रिका काढता येणार आहे.
अन्नधान्य पुरवठा विभागाच्या कार्यालयाला नेहमीच दलालांचा विळखा असतो. पुरवठा विभागाच्या कार्यालयात पाऊल टाकताच दलालांचा विळखा पडतो. सामान्य नागरिकांना शिधापत्रिका काढण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे त्यांचा कल दलांलाकडे जास्त असतो. त्याचा गैरफायदा घेत दलालांकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पुरवठा विभागातील दलालांच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे नागरिक घरबसल्या ऑनलाइन करू शकतील, अशी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. येत्या महिनाभरामध्ये हे सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर राज्याच्या सर्व पुरवठा विभागाच्या कार्यालयांमध्ये ते बसविण्यात येणार असून त्यानंतर सर्व नागरिक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे शिधापत्रिका काढू शकतील.
सध्या नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी वीस रुपये तर दुबार शिधापत्रिका काढण्यासाठी चाळीस रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते. नागरिकांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे शिधापत्रिका काढण्यासाठी संपर्क केला तर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर निर्धारित वेळेत नागरिकांना शिधापत्रिका दिल्या जातात. मात्र, पुरवठा विभागाच्या भोवती विळखा घालून बसलेले दलाल त्यांना पुरवठा विभागापर्यंत पोहोचू देत नाहीत. कार्यालयाच्या परिसरातील दलाल शिधापत्रिका काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडूनच शिधापत्रिका काढणे कसे योग्य आहे ते सांगतात. त्यामुळे दलालांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुरवठा विभागातील कामे दलालांकडे दिली जातात. ऑनलाइन प्रक्रिया झाल्यानंतर हा सर्व प्रकार बंद होणार असून पुरवठा विभागाचा परिसरही दलालमुक्त होणार आहे. येत्या महिनाभरात शिधापत्रिका काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन होण्याची शक्यता पुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.