“शिवसेना नेता रघुनाथ कुचिक प्रकरणी न्याय मिळावा यासाठी आजवर अनेकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मी फोन केले. पण त्यांनी कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद दिला नाही,” असा दावा पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषदेत केलाय. या प्रकरणामध्ये पीडितेने थेट रुपाली चाकणकर यांचा उल्लेख करत काही गंभीर वक्तव्य केली आहेत.
“शिवसेना नेते रघुनाथ कुचिक याने माझ्यावर अत्याचार केले आहे. मला न्याय मिळावा यासाठी आजपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना अनेकदा मेल करुन दाद मागितली. यावर कोणीही प्रतिसाद दिला नाही. मला न्याय द्यावा. मला खूप त्रास होत असून माझ्या जिवाला काही झाल्यास त्याला रघुनाथ कुचिक हेच जबाबदार असतील,” असंही या तरुणीने म्हटलं आहे. तसेच, “माझ्याकडे (कुचिक यांच्याविरोधात) अनेक पुरावे आहेत. ते मी न्यायालयामध्ये सादर करणार आहे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून रघुनाथ कुचिक यांच्यावर कारवाई करावी,” अशी मागणी देखील या तरुणीने केली.
“माझ्यावर आरोप केले जातात की, चित्रा वाघ यांची मला मदत आहे. पण असे काही नसून मी सर्वांकडे मदत मागितली आहे. कोणीच मदत केली नाही. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची दखल घेऊन, तात्काळ आदेश दिले आहेत. तशी माझ्या मागणीकडे देखील त्यांनी लक्ष द्यावे, मला न्याय मिळावा यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अनेक वेळा फोन केला. पण त्याला त्यांनी रिप्लाय देखील दिला नाही, असे या तरुणीने सांगितले.