नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांनी जामीन मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

ढवळे, राऊत, विल्सन यांनी शनिवारी विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेली पत्रे बनावट आहेत.

या गुन्ह्य़ाशी आमचा संबंध नाही, असे त्यांनी न्यायालयाकडे सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. अ‍ॅड. सिद्धार्थ पाटील, अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज सादर केला असून या अर्जावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, याप्रकरणी नजरकैदेत असलेले वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अरूण परेरा यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील संशयित प्रा. सोमा सेन यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील आणखी एक संशयित अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर ते स्वत: १३ नोव्हेंबर रोजी बाजू मांडणार आहेत.