पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यांनी शिवसेनेचे शिरिष फडतरे यांचा नऊ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक लक्ष्मीकांत खाबिया यांची अध्यक्षपदावरील निवड निश्चित मानली जात होती. मात्र, अचानक पक्षाकडून चौधरी यांना संधी मिळाली.
मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. शिक्षण मंडळात राष्ट्रवादीचे पाच, आरपीआयचा एक आणि काँग्रेसचे तीन असे नऊ जणांचे संख्याबळ सत्ताधारी आघाडीकडे आहे. तर, भाजपचे तीन, मनसेचे दोन आणि शिवसेनेचा एक असे विरोधकांचे संख्याबळ आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या चौधरी यांना नऊ आणि शिवसेना-भाजप युतीचे फडतरे यांना चार मते मिळाली. मनसे या निवडणुकीतही तटस्थ राहिली. उपमहापौर बंडू गायकवाड, सभागृहनेता सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण मंडळ सदस्य म्हणून प्रथमच निवड झाली आहे आणि आता अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. मंडळाचा कारभार सुधारण्याबरोबरच संपूर्ण कारभार चकाचक करण्यावर भर राहील, असे चौधरी यांनी निवडीनंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा