मुंबईतील रवी पुजारी टोळीतील सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. पर्वती पायथा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
नवा उर्फ नवनाथ सूर्यकांत वाल्हेकर (वय २८, रा. कांदे आळी, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. रवी पुजारी टोळीतील सराईत नीलेश भरम (वय २६, रा. देवाशिष अपार्टमेंट, कामोठे,नवी मुंबई) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कात्रज येथील एका विदेशी मद्य विक्री करणाऱ्या दुकानात दरोडा टाकला होता. पिस्तुलाच्या धाकाने ६९ हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्य़ात भरम, त्याचे साथीदार उमेश कोकाटे, संतोष मराठे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, वाल्हेकर हा पोलिसांना गुंगारा देत होता. वाल्हेकर हा पर्वती पायथा येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रदीप गुरव यांना मिळाली. त्याआधारे जनता वसाहत परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, प्रवीण काळभोर, समीर बागसिराज, बाबासाहेब नराळे यांनी ही कारवाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा