अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान दिलं आहे. याच मुद्द्यावरुन कालपासून मातोश्रीसमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले आहेत. असं असतानाच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय. स्वागत करायचं नसेल तर पोलिसांना सांगा कार्यकर्ते गोळा करुन कायदा सुव्यवस्था कशाला हातात घेता असा सवाल पाटील यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत बोलताना विचारलाय.
“समजा मातोश्रीवर येणार असेल तर मातोश्रीच्या प्रमुखांनी तक्रार द्यायची असते की मला सुरक्षा पुरवा. पोलीस सुरक्षा देत असतात. सध्याची मोहित कंबोज हल्ला प्रकरण, पोलखोल यात्रेवर झालेली गडफेक आणि आता राणा प्रकरण पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. अकोल्यातील कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही टाकलं तर त्याच्या घरात घुसून शिवसैनिकांनी दम दिला. हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असं पाटील म्हणाले आहेत.
“महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरामीटर बदलत आहेत. त्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था हातात घेणं हा नवा पॅरामीटर त्यांनी डेव्हलप केलाय,” असा टोला पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. “मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल, पोल खोल यात्रेच्या दगडफेकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पकडले गेले ते असेल किंवा आज जो ड्रामा सुरु आहे. हाय व्होल्टेज ड्रामा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर प्रचंड संख्येने शिवसैनिक गोळा झाले असून त्यांनी बॅरिकेट्स तोडले. ज्या प्रकाराने हे सगळं चाललंय हे सामान्य माणसाला न कळणारं आहे. भाजपा याचा निषेध करतेय याबद्दल चिंता व्यक्त करतेय,” असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
“सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, नेते सगळे जाऊन बसलेत त्या राणांच्या घरासमोर कसे बाहेर पडतात बघू अरे हे पोलिसांचं काम आहे तुमचं काम नाहीय,” असा टोला पाटील यांनी शिवसैनिकांना लगावलाय. “राणांनी म्हटलं की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन हनुमान चालिसा म्हणणार आहोत. तुम्ही म्हटलं पाहिजे की समोर कशाला घराच्या आतमध्ये या. खुर्चांची व्यवस्था करा, प्रसादाची व्यवस्था करा. हनुमान चालिसा ही काय राक्षस चालिसा आहे का?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. “ज्या मारुतीला आपण शक्तीचं प्रतिक म्हणून पाहतो त्याचं मारुती स्त्रोत्र किंवा हनुमान चालिसा कोणी म्हणणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. स्वागत करायचं नसेल तर पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपले कार्यकर्ते बोलवून कायदा सुव्यवस्था कशाला हातात घ्यायची,” असं पाटील म्हणालेत.