पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. धंगेकर यांनी समाजमाध्यमातून तसे स्पष्ट संकेत दिल्यानंतर शिवसेना नेते, उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी धंगेकर यांना पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ‘मी लपून जाणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असे सांगून धंगेकर यांनीही या चर्चेला पुष्टी दिली आहे. धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास काँग्रेसची शहरातील ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यांनी कसब्याचे विद्यामान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपचे उमेदवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांना हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ते काँग्रेस सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी समाजमाध्यमातून सूचक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यामुळे या चर्चेला जोर मिळाला. स्वत: सामंत यांनी धंगेकर यांना पक्षात येण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्याचे जाहीर केल्याने धंगेकर यांचा पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच राहिल्याचेही बोलले जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर काँग्रेसपासून फारकत घेणार असल्याची चर्चा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने धंगेकरांच्या पक्षप्रवेशाला जोर मिळाला आहे. त्यांचा लवकरच प्रवेश होईल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

पक्षांतर्गत तक्रारी

भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजयानंतर धंगेकर काँग्रेसला ‘जवळचे’ झाले होते. मात्र, काँग्रेसमध्ये असूनही ते काँग्रेसची विचारधारा मानत नसल्याच्या तक्रारी त्यांच्याविरोधात सुरू झाल्या होत्या. कधी शिवसेना कार्यकर्त्याच्या, तर कधी ‘मनसे’ शैलीप्रमाणे ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत ते वावरत असल्याच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या.

समाजमाध्यमातील छायाचित्र शिवजयंती वेळचे आहे. भगवा गळ्यात ठेवणे गैर नाही. माझे मित्र सगळीकडे आहेत. मला धर्माचा अभिमान आहे. माझे सगळीकडे स्वागत होत आहे. त्यामुळे सामंत यांनी स्वागत करू असे सांगितले. पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव येणे चुकीचे नाही. मी लपून जाणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल रवींद्र धंगेकरमाजी आमदार, काँग्रेस