लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी पत्रकार भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जाणारे शेतकरी नेते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धारेवर धरले.
मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना तुपकर यांनी सरकारी धोरणांवर सडकून टीका केली. लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारला प्रश्न विचारले. ‘शेतकरी कर्जमाफी मिळावी म्हणून मदत मागतो आहे, आंदोलने करतो आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही आंदोलन करत नाही. मागणी नसतानाही निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीला पैसे दिले. मात्र, शेतकऱ्याला पैसे द्यायचे म्हणाले की सरकारी तिजोरी रिकामी असते. सरकारकडे पैसे नसतात’, असे तुपकर म्हणाले.
‘सोयाबीन-कापूस शेतकरी मरणाच्या दारात गेलेला आहे. सरकारने अजूनही सोयाबीन खरेदी केलेले नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एकरकमी एफआरपी दिलेली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारच्या धोरणांमुळे आलेली आहे,’ अशी टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले, की सरकारी तिजोरीत खडखडाट असतो. मात्र, कुणाचीही मागणी नसताना लाडकी बहीण योजनेला पैसे दिले जातात. पैसे नसतील तर एखादा शक्तिपीठ मार्ग थांबवून शेतकऱ्याला कर्जमाफी द्या. शेतकऱ्याला मारून विकासाचे मनोरे कशासाठी?असा सवाल विचारत तुपकर म्हणाले, ‘राज्यातील महिला असुरक्षित आहेत. सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. कष्ट करणारे उपाशी मरतात. मात्र, राजकारणी मजेत आहेत,’ असेही तुपकर म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर १९ मार्चला मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी या वेळी दिला.