पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत. दरम्यान परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा- कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात
भारतीय जनता पक्षाने प्रचारादरम्यान पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी धंगेकर हे आज सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला बसले आहेत. या निवडणुकीत ”लोकशाहीची हत्या झाली आहे, त्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची, भूमिका धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- पुणे: ससून रुग्णालयात कोयता गँगची दहशत
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली आहे. नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली असीम, ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. तसेच रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तसेच नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार संपल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.