Ravindra Dhangekar on Deenanath Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेकडून अनामत रक्कम मागितल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. अनामत रक्कम न भरल्याने या महिलेवर वेळेवर उपचार सुरू न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. याप्रकरणावरून आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मनमानी कारभाराविरोधात टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसमधून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेलेले रवींद्र धंगेकर यांनीही या रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, “मंगेशकर कुटुंबाचं या देशासाठी मोठं योगदान आहे. पण मंगेशकर परिवार आणि या रुग्णालयाचे प्रशासन हे वेगळे भाग आहेत. मंगेशकर कुटुंबियांच्या नावाने सरकारने करोडे रुपयांची जागा मोफत दिली. पण या प्रशासनाने डोळेझाक करून महसूल बुडवला. महानगरपालिकेचा २७ कोटींचा कर प्रलंबित आहे. १०० कोटींपेक्षा जास्त दंड भरलेला नाही. हे कोणाच्या जीवावर चालतं? कोण यांच्या पाठीशी आहे?”

लोकांचे कपडे बघून प्रवेश दिला जातो

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो रुग्ण असतात. त्यांना कसे उपचार मिळतात हे सर्वांना माहितेय. ज्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू केले, तो उद्देश साध्य होतोय की नाही महत्त्वाचं आहे. संचालक तिथे मालक म्हणून तिथे वावरतात. राजकीय पाठिंबा असल्याने ते या धुंदित वागतात. तामिळनाडू राज्याप्रमाणे आपल्याही राज्याला माफी मागायची वेळ येऊ नये. पण लोकांचे कपडे बघून या रुग्णालयात प्रवेश दिला जातो”, असा गंभीर आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

पंचतारांकित हॉटेलप्रमाणे रुग्णालय काढलंय

“या रुग्णालयाची जागा देताना १७ नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. हे नियम पाळते जात नाहीत. येथे नियमभंग केला जातो. वृक्षारोपण, पार्किंगचे पैसे घेऊ नये असे येथे काही नियम आहेत. या संस्थेतील अनेक युनिट भाड्याने दिलेले आहेत. त्यामुळे या विरोधात शासनाने आता उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळेल. पंचतारांकित हॉटेलसारखं रुग्णालय काढलं आहे. सर्वसामान्य माणूस तिथे पोहोचला पाहिजे. हे कमर्शिअल रुग्णालय झालं आहे”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.