देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते लोक हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना देतील, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर इंडिया आघाडीकडून टीकाही करण्यात आली. दरम्यान, पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही यावरून मोदी यांना लक्ष्य केलं आहे. मंगळ ग्रहाकडे जाणारा देश आज पुन्हा मंगळसूत्राकडे जातो आहे, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले, पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

“प्रचारसभांमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी मंगळसूत्रावर बोलत आहेत. आज आपला देश महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय, या देशाला आजपर्यंत मोठे पंतप्रधान मिळाले, त्यांनी नेहमी विकासाची भाषा केली. ते मंगळ ग्रहावर जाण्याची भाषा करत होते. मात्र, आज मंगळ ग्रहावर जाण्याची भाषा करणाऱ्या देशाचे पंतप्रधान मंगळसूत्राबाबत बोलत आहेत. हे दुर्दैवी आहे”, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.

हेही वाचा – “प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठा गटाची मोदींवर टीका

“आज आपण जगावर राज्य करायला निघालो असताना परत हे लोक परत महिलांच्या मंगळसूत्रांवर बोलत आहेत. यावरून त्यांना ही निवडणूक कुठे आणि कशापद्धतीने न्यायची आहे, हे स्पष्ट होते. हा चिंतेच विषय आहे. मुळात मोदींना महिलांच्या मंगळसूत्रांची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही त्यांचे भाऊ समर्थ आहोत. आम्ही ताकदीने महिलांच्या पाठिशी उभे राहू”, अशी टीकाही त्यांनी केली.

आज पुण्यात राहुल गांधी यांची सभा होणार आहे, यासंदर्भातही धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आज पुण्यात राहुल गांधी देशाच्या भविष्यावर, विकासावर, युवकांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या सुरक्षेवर बोलणार आहेत, देशाला विचार देणारी त्यांची ही सभा असणार आहे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “मंगळसूत्राचं महत्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?” उद्धव ठाकरेंचा सवाल

राजस्थानच्या सभेत मोदी नेमकं काय म्हणाले होते?

“काँग्रेसने ज्या योजना आणल्या त्यातून त्यांची धोरणं जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना सगळी मदत करणं आहे. जे घुसखोर आहेत त्यांना काँग्रेसची मदत होते आहे. मी माता भगिनींना सांगू इच्छितो की यांचा अर्बन नक्षलवादाचा विचार हा तुमच्या गळ्यात तुमचं मंगळसूत्रही ठेवणार नाही.” असं मोदी म्हणाले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra dhangekar criticized pm narendra modi over mangalsutra statement spb