पुणे : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील १४ दिवसांपासून जालना जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं सरकारकडून सातत्याने आवाहन होत असलं तरीही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तर कालपासून जरांगे पाटलांनी पाणी आणि औषध त्याग केला असून वैद्यकीय तपासणी करण्यासही विरोध केला आहे. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे. यावर पुण्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, खोटी आणि भंपक आश्वासने देऊन राज्य सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप त्यांनी केला.
असता ते म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहे. त्या प्रत्येक आंदोलना दरम्यान राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यात आजवर झालेल्या निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशा घोषणा केल्या. पण आजच्या स्थितीला मराठा समाजासह इतर समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवसांत आरक्षण देऊ, महिन्यात आणि दोन महिन्यात देऊ अशा घोषणा दिल्याचे आपण सर्वानी पाहिले आहे. पण निवडणुका झाल्यावर या नेतेमंडळींची बोलण्याची भाषा बदलली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मागील १५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आता त्यांची तब्येत खराब आहे. पण आमची त्यांना विनंती आहे की, थोडं थांबून तब्येतीची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तसेच आपण आगामी काळात येणार्या निवडणुकीत सरकारला जाब विचारू. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य!
हेही वाचा – लोकअदालतीत एक लाखांहून अधिक दावे निकाली… ३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल
राज्यातील मराठा समाजासह सर्वच समाजाला खोटी आणि भंपक आश्वासने देऊन राज्य सरकारने समाजाला फसविले आहे. त्यामुळे त्याचा उद्रेक आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काही नागरिकांनी भंडारा उधळला आहे. हा सर्व सामन्यांचा उद्रेक असून आगामी काळात अधिक उद्रेक दिसेल, अशा शब्दांत रवींद्र धंगेकर यांना राज्य सरकारला इशारा दिला.