पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पस्तीस वर्षानंतर परिवर्तन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची केवळ औपचारिकता राहिली आहे. धंगेकर सात हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचे दिसून येत असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. या निवडणुकीत सन १९९१ च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९१ मध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत कँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर मात्र बापट यांनी मतदारसंघाची बांधणी करत कसबा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व ठेवले होते. ते या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले होते. ते खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याने कसब्यात पस्तीस वर्षानंतर परिवर्तन झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Kasba Bypoll Election Result 2023: कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

हेही वाचा – Kasba By Poll Election Result 2023 : कसब्यातील पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपाचे हेमंत रासने म्हणतात, “माझ्या दृष्टीने हा निकाल…!”

टिळक कुटुंबियांना नाकारलेली उमेदवारी, त्यातून ब्राह्मण समाजात निर्माण झालेल्या नाराजीचा फटका भाजपाला बसल्याचे दिसत आहे. त्याउलट महाविकास आघाडीची ताकद आणि एकजूट निवडणुकीत दिसून आली. भाजपाला त्यांच्या हक्काच्या दोन प्रभागातही अपेक्षित मतदान होऊ शकले नाही. भाजपाची भिस्त असलेल्या या प्रभागात रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतल्याने हक्काच्या मतदारांनी रासने यांना नाकारल्याचे दिसून येत आहे.
पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाकडून साम दाम दंडाचा वापर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात तळ ठोकावा लागला होता. राज्याचे निम्मे मंत्रिमंडळ पुण्यातील भाजपाच्या प्रचारात गुंतले होते. गणेश मंडळांना चांदीचे वाटप करण्याबरोबरच मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आल्याचे आरोपही झाले होते. या पार्श्वभूमीवर मतदारांनी भाजपाला नाकारल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra dhangekar is close to victory in the kasba byelection and mahavikas aghadi entry in bjp stronhold kasba pune print news apk 13 ssb