पुण्यातील पोर्श कार अपघाताप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार पहून पोलीस आणि गृहमंत्रालयावर टीका होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या काही मुद्यांवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतले. धंगेकर म्हणाले, “फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे पुणेकरांची दिशाभूल करणारे आहेत. उपघाताची घटना घडल्यानंतर पहिल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी शोधलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर कलम ३०४ अ आणि कलम ३०४ ची नोंद करण्यात आली.”
धंगेकर म्हणाले, “गृहमंत्र्यांना गुन्हा दाखल केल्याची (एफआयआर) पहिली प्रत बदलण्याबाबत महिती दिली नव्हती का? की त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि त्या बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकारी आणि मंत्री आज आहेत, उद्या निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्यातील पिढ्या बरबाद करण्याचं काम करेल.” धंगेकरांच्या एक्सवरील या पोस्टवर पुण्याचे माजी महापौर आणि पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली.
मुरलीधर मोहोळ धंगेकरांना उद्देशून म्हणाले, “लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग ते प्रकरण न्यायालयात जातं. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे.” मुरलीधर मोहोळांच्या या पोस्टवर धंगेकर यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत त्यांना प्रश्न विचारला आहे की, “तुम्हाला F.I.R. आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का?”
मोहोळांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत रवींद्र धंगेकर म्हणाले, “तरीच म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत? कदाचित त्याची (आरोपीचे वडील) बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणं आहे की एफआयआरमध्ये कलम ३०४ ची नोंद का केली नाही? यासह मी एफआयआरची मूळ प्रत जोडतोय ती नीट वाचून घ्या.”
हे ही वाचा >> भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
धंगेकर म्हणाले, “इथे दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या घरातली दोन कमावती मुलं गेली आहेत. त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेबरोबर राहाल अशी माझी अपेक्षा होती. पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. ३-४ वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेले होतात? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत. पोलिसांनी आपलं कर्तव्य नीट बजावलं असतं तर ही घटना घडली नसती.”