पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका पबमध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कारवाई करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीतही केले होते. दरम्यान, या प्रकरणावरून आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लक्ष्य केलं आहे.
रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, पुणे पोलिसांची कारवाई म्हणजे केवळ नौटंकी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश! अखेर पुणे विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी
नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण असेल किंवा नुकताच उघडकीस आलेलं ड्रग्ज प्रकरण असेल, या प्रकरणांमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. सध्या ज्याप्रकारे कारवाई करण्यात येत आहे, ती संपूर्णपणे नौटंकी आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“…तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही”
पुढे बोलताना, आम्ही दोषींवर कारवाई करतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असून जोपर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होत नाही आणि त्यांना तुरुंगात टाकलं जात नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: तुतारीचं काम करणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचं बैठकीत परखड मत..म्हणाले, लोकसभेत…!
पुणे पोलीस आयुक्तांनी नेमकी काय कारवाई केली?
दरम्यान, पुण्यातील मुलांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पबमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले होते. याशिवाय शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनादेखील निलंबित करण्यात आलं होते. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून संबंधित पब पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचेही तपासात उघडकीस आले होते.