राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील पायभूत सुविधा करिता १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर १० कोटींचा निधी न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिला.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणूक होऊन जवळपास सात महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्या काळात मी राज्य सरकारकडे जवळपास १०० कामे सुचविली होती. त्यासाठी १० कोटींचा निधीदेखील मंजूर झाला होता. पण अचानकपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळविल्याची माहिती समोर आली आहे. या कृतीमधून भाजपाच्या नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही माझा अपमान करा, तो मी अपमान सहन करेल. पण मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे शहरातील ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमासाठी जातील, त्या ठिकाणी मी आंदोलन करून जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे: मोकाट श्वानांच्या लसीकरण,नसबंदी मोहिमेत अडथळा; महापालिकेकडून कारवाईचा इशारा
हेही वाचा – आमदार चेतन तुपे कोणत्या गटात?… अजित पवारांबरोबर व्यासपीठावर
या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लक्ष घालून निधीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. पण त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून निर्णय न घेतल्यास चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला.