दैनंदिन जीवनात लागणाऱ्या, अनेक उपयुक्त वस्तू, पदार्थ आपण विशिष्ट भागातील बाजारपेठेत जाऊन ठराविक दुकानातूनच घेत असतो. आपली अभिरुची आणि त्या वस्तूंच्या उपलब्धतेची सांगड बसत गेली की व्यापारालासुद्धा बरकत येते. विशिष्ट मालाच्या विक्रीची बाजारपेठ ठराविक भागात केंद्रित होणे हे पुण्यनगरीचे ऐतिहासिक वैशिष्टय़ आजतागायत टिकून आहे. भाजीपाला, धान्य, कापड, दूध, लाकूड या जीवनावश्यक बाबींच्या बाजारपेठांबरोबर कसबा, बुधवार, रविवार पेठेच्या सीमावर्ती भागात मुख्यत्वे, फडके हौद ते सोन्या मारुती हा परिसर आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये, पूजा साहित्य आणि विशेषत: उदबत्ती व्यावसायिकांचा जम बसल्याचे सहजपणे जाणवते.
सहजपणे, फडके हौद आणि जवळच्या परिसरात फेरफटका मारला तर या भागात देवाचे दागिने, पूजा साहित्य, झेंडे पताका, सजावट साहित्य आणि सोनारीकामाला पूरक अशा सेवा देणारी शेकडो दुकाने दिसतात. याबाबत इतिहासाचा वेध घेतला तर असे लक्षात येते, नागरी वस्तीला पूरक अशा सेवा देणाऱ्या महत्त्वाच्या व्यावसायिकांना, विशेषत: पेशवाई काळात भाविक या भागात केंद्रित केले गेले. गाव विकासाबरोबर व्यवसायवृद्धी होऊन, बाजारपेठासुद्धा वृद्धिंगत होत गेल्या आणि स्थलांतरीतसुद्धा झाल्या. फडके हौदाशी सरदार हरिपंत फडके यांचे नाव निगडित असले आणि रविवार पेठ ही चिमाजी अप्पांनी वसवली तरी उदबत्त्यांची बाजारपेठ ही १८६२ नंतरच या भागात विकसित झाल्याची माहिती मिळाली. बाजारपेठ वसण्याआधी या भागात दर रविवारी आठवडी बाजार भरत असे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या, मोजक्या इमारती, वाडे अजूनही या परिसरात टिकून आहेत.
फडके हौद परिसरातील उदबत्त्यांचे प्रमुख व्यापारी आणि किमान चार पिढय़ा व्यापार करणारी विठ्ठलदास नारायणदास, दामोदरदास भगवानदास, लक्ष्मणदास गोकुळदास, हरिदास माधवदास आणि जहागीरदार बंधू ही पाच दुकाने आहेत. शहरातील इतर भागातही हा व्यवसाय विखुरलेला आहे. मंडई, शनिपार भागात गोविंद दाजी, ए. व्ही. काळे, मनोहर सुगंधी, गणेश पेठेत धुमधडाका, रास्ता पेठेत लक्ष्मी सुगंधालय अशी काही प्रसिद्ध दुकाने आहेत. पासोडय़ा विठोबाजवळील आर. आर. धूत तसेच सुर्वे बंधू आणि मोती चौकातील साई सुगंधालय यांचादेखील उदबत्तीच्या व्यवसायात लौकिक आहे.
विठ्ठलदास नारायणदास यांच्या पेढीची भव्य तीन मजली वास्तू फडके हौद चौकात असून, व्यवसायाइतकी ही वास्तू ऐतिहासिक आहे. कन्हैयालाल सुगंधी यांनी एकूणच या व्यवसायाची तपशीलवार माहिती दिली. सुगंधी आडनाव लावणारी ही मंडळी वैष्णव नागर समाजाची, हटकेश्वर महादेव हे त्यांचे कुलदैवत. ही मंडळी गुजराथमधील मेहसाणा जिल्ह्य़ातील वडनगरची! परकीयांच्या जाचामुळे, शिवकाळात अनेक कुटुंबे, जुन्नर परिसरात स्थलांतरीत झाली आणि पुढील काळात पुणे मुक्कामी स्थिरस्थावर झाले. पुण्यात या समाजाची, सुमारे ३५० कुटुंबे राहतात तर देशभरात पंचवीस हजार व्यक्ती या समाजाचे असल्याचे समजले. उच्चशिक्षित तसेच देव, देश आणि धर्मावर निष्ठा असणारी ही मंडळी असल्याचे कन्हैयालाल यांनी सांगितले. श्रेयस आणि चंद्रशेखर या नव्या पिढीतील त्यांच्या वारसांनी, कनोज परफ्युमरी इन्स्टिटय़ूटचा व्यासायिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. धनश्री ग्रीन रोज, केशर चंदन, अंबर कस्तुरी, धूप कप ही उत्पादने विठ्ठलदास पेढीची खासियत आहे. या उदबत्त्यांचा एकत्रित सुवास हे फडके हौद चौकाचे वैशिष्टय़ आहे.
दामोदरदास भगवानदास ही पेढी या परिसरात १८७२ साली स्थापन झाली. त्याच काळातील एक मजली इमारत आजही जतन करण्यात आली आहे. लोड- तक्क्य़ाची पारंपरिक बैठक आणि गणेशपूजा हे या पेढीचे वैशिष्टय़ आहे. बडोदा संस्थान तसेच जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशातही पेढीच्या उत्पादनाला मागणी टिकून असल्याचे पुरुषोत्तमदास यांनी सांगितले. अंबर कस्तुरी १०१०, राज दरबारी, सिद्धी, समृद्धी ईश्वरी ही त्यांची लोकप्रिय उत्पादने आहेत.
लक्ष्मणदास गोकूळदास यांनी व्यवसाय १९३४ साली सुरू केला. सितारा, महालक्ष्मी, सुगंध सरिता तसेच दोरा बत्ती ही त्यांच्या व्यवसायाची ओळख आहे. पूर्णपणे देशी कच्च्या मालापासूनच स्वत:ची उत्पादने करतो असे रवींद्र गांधी यांनी सांगितले. प्रामुख्याने बंगलोर, चेन्नई, सागर या दक्षिणेकडील शहरातून कच्चा माल उपलब्ध होतो. अहमदाबादमध्ये उदबत्त्यांचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर असून तेथून किफायतशीर दरात संपूर्ण देशाला पुरवठा होतो, अशी माहिती रवींद्र यांनी दिली.
चिनी उत्पादकांचे, अलीकडच्या काही वर्षांत वाढते आक्रमण ही चिंतेची बाब असल्याचे हरिदास माधवदास पेढीचे नंदकुमार सुगंधी यांनी सांगितले. बापू गंधे यांनी छोटय़ा घरगुती व्यवसायातून, उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. उच्च शिक्षित नवी पिढी, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे या व्यवसायाची व्यापकता वाढवीत आहे, असे नंदकुमार यांनी सांगितले. हातवळणाची उदबत्ती करणाऱ्या कारागिरांची संख्या संपुष्टात येत असून, प्रचंड क्षमतेच्या यंत्रांमुळे चीन, तैवान, व्हिएतनाम येथून आकर्षक पॅकिंगमध्ये, स्वस्त दरातील उदबत्त्या, जगभरात निर्यात होत आहेत. गुणवत्ता आणि पारंपरिक विश्वासावर देशी उत्पादने मागणी टिकवून राहतील, असा नंदकुमार सुगंधी यांचा विश्वास आहे.पासोडय़ा विठोबा मंदिराजवळ आर. आर. धूत अॅण्ड सन्स हे पूजा साहित्याचे दुकान १९५६ साली रामचंद्र धूत यांनी सुरू केले. धूत परिवाराची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. हावडा एक्स्प्रेस, कार्यसिद्धी, स्पेशल हीना या उदबत्त्या आणि सुगंधी अष्ठगंध ही त्यांची ओळख आहे. सर्व कुटुंबीय उच्चशिक्षित आहेत. दिलीप धूत यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक पिढीजात व्यवसायाला प्राधान्य दिले ही बाब महत्त्वाची वाटते. एकाच वेळी तीन पिढय़ांचे प्रतिनिधी, त्यांच्या व्यवसायाबद्दल आत्मीयतेने बोलताहेत. अशी बाब गणेश पेठेतील धूमधडाका उदबत्तीचा कारखाना येथे अनुभवली. हा व्यवसाय १९१३ साली मोतीलाल दर्डा यांनी सुरू केला. आपल्य नातवाने, केमिकल इंजिनिअरिंगची पदवी तसेच त्याने मिळवलेली अनेक पारितोषिके भगवानदास मला आपुलकीने दाखवीत होते. गणेश पेठेतील ओस्वाल ट्रेडर्स आणि बंदीवान मारुती समोरील शहा सुगंधी वर्क्स ही दुकाने उदबत्ती शौकिनांचे आकर्षण आहेत. शहा सुगंधी यांच्या व्यवसायाची स्थापना १९५१ साली झाली असून दैनंदिन वापराच्या, स्वस्त दर्जेदार उदबत्त्या हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. रास्ता पेठेतील मद्रासी गणपती परिसरात उदबत्ती व्यावसायिकांची काही दुकाने असून, लक्ष्मी सुगंधालय हे दुकान मुख्यत्वे घाऊक व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. भरगच्च दुकान, कोणत्याही वेळी ग्राहकांनी गजबजलेले असते.
मोती चौकामध्ये साई सुगंधालयाने अलीकडच्या काळातील नवा व्यवसाय असूनही जम बसवला आहे. मंडई परिसरात टिळक पुतळ्यासमोर पूजा साहित्याची अनेक दुकाने असून, मनोहर सुगंधी, घोलप, शिंदे, परिमल, सिद्धी असे सर्व व्यावसायिक त्यांच्या परंपरागत उदबत्ती उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत. मनोहर सुगंधी हा व्यवसाय गानू परिवाराने १९३२ साली सुरू केला असून अमृतकलश, पारिजातक, ओंकाररूद्र, बकूळ या त्यांच्या उदबत्त्यांना विशेष मागणी असते.
पुण्यातील उदबत्ती व्यावसायिकांचा एकंदरीत आढावा घेतला तर असे लक्षात येते की, बहुसंख्य हे सुशिक्षित, सधन घराण्यातील, धार्मिक वृत्तीचे आणि व्यवहारापलीकडे जाऊन परंपरा जपणारे आहेत. देव, देश आणि धर्मासाठी अनेक जण बिनबोभाट कार्यरत आहेत. उत्पादक विक्रेते आणि फक्त विक्रेते अशी ठळक विभागणी या व्यवसायात लक्षात येते.
पुण्यातील व्यवसायाचे मूळ स्रोत लक्षात घेता असे लक्षात येते की, विठ्ठलदास नारायणदास पेढीचे वंशज शिवकाळात, सुरक्षेच्या कारणास्तव गुजराथमधून जुन्नरमार्गे पुण्यात आले. नारायणदास आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १८६० च्या सुमारास स्वहस्ते उदबत्त्या तयार करून, समक्ष फिरून विकण्यास सुरुवात केली. कालांतराने आपल्या मुलाच्या नावाने ‘विठ्ठलदास नारायणदास अॅण्ड सन्स’ या नावाने कमळ चिन्हांकित अधिकृत व्यवसाय सुरू केला. याच व्यवसायाची तीन मजली इमारत कसबा पेठेचे आणि पुण्याचे वास्तुवैभव ठरली आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात हातवळणाच्या उदबत्त्यांची मागणी आजही टिकून आहे. कारण हा व्यवसाय भारतीय संस्कृती आणि परंपरांशी निगडित आहे. चिनी व्यावसायिकांचे मोठे आक्रमण या क्षेत्रावर असले तरी त्यांच्याशी स्पर्धा करून भारतीय व्यावसायिक निष्ठेने परंपरा जपत आहेत. धार्मिकता ही कालातीत असून, ध्यानधारणा आणि योगविज्ञान प्रसाराने व्यवसायवृद्धी अबाधित आहे. आव्हान आहे ते उदबत्त्या वळण्यासाठी मिळणाऱ्या मनुष्यबळाचे! एक व्यक्ती मुख्यत्वे महिला मंडळी २ किलो सुगंधी मालापासून दीड ते दोन हजार उदबत्त्या तयार करतात अशी माहिती कन्हैयालाल सुगंधी यांनी दिली. मात्र अशा कारागिरांची संख्या कमी होत असल्याची खंत सर्व उत्पादकांनी व्यक्त केली. तयार उत्पादने विकणे सोपे. कारण बाजारपेठेची लवचिकता सहजपणे इथे परावर्तित होऊ शकते. परंतु, स्वत:ची स्थावर मालमत्ता असलेल्या ठिकाणी आव्हानांना तोंड देत केवळ लौकिक आणि वारसा, परंपरा जपण्यासाठी व्यवसाय जपणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे.
उदबत्ती व्यावसायिकांच्या बाजारपेठेचा वेध घेताना जाणवला तो संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि जिवापाड जपलेल्या परंपरांचा गंध! अनेक ठिकाणी व्यावहारिक गणितांपलीकडे जाऊन सद्भावनेला साद देणारी माणसे या क्षेत्रात देखील आहेत. स्वत: जळून उजळणे आणि दरवळणे हा उदबत्तीचा गुणधर्म जपणारे अनेक जण या व्यवसायात आहेत. बाजारभेटीच्या निमित्ताने हा लेखन प्रपंच!