आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे. त्यामुळे आता त्यांची सत्ता येणार नाही, असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. दलित-मुस्लीम-ख्रिश्चन-परप्रांतीय महासंघातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पिंपरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी आठवले बोलत होते. या वेळी संघटनेचे प्रमुख फारुख शेख, दस्तगीर मणियार, सतीश कांबळे आदी उपस्थित होते. महायुती सत्तवेर आल्यावर महासंघटनेच्या मागण्या मान्य करु, असे आश्वासन आठवले यांनी या वेळी दिले. आठवले म्हणाले,की देशात एकता, अखंडता ठेवण्यासाठी माणुसकी मोठी असून ती टिकवण्याचा प्रयत्न महासंघाकडून सुरु आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. आघाडीकडून गरीब, मागासवर्गाचा विचार होत नसून अल्पसंख्यकांना भाजप-शिवसनेच्या विरुद्ध भडकावले जात आहे. भ्रष्टाचार बंद आणि टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार महायुतीने केला आहे.

Story img Loader